Sunday, July 14, 2024

/

सी डी प्रकरणाची चौकशी व्हावी : सी एम इब्राहिम

 belgaum

बेळगाव लाईव्ह : माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या कथित अश्लील सीडी प्रकरणावरून जेडीएस नेते सी. एम. इब्राहिम यांनी जोरदार टीका केली आहे.

आज खानापूर येथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना प्रतिक्रिया देताना सी. एम. इब्राहिम म्हणाले, कर्नाटक हे वीरपुरुषांचे राज्य आहे. अशा राज्यात एका राष्ट्रीय पक्षातील जबाबदार व्यक्तीने अशा पद्धतीने कृत्य करणे हे लज्जास्पद आहे. असे कृत्य करताना त्यांना अक्कल नव्हती का? रमेश जारकीहोळी हे स्वतःची बाजू सत्य असल्याचे सांगतात तर डीकेशिवकुमार हे देखील आपली बाजू सत्याची असल्याचे सांगतात, नेमकी कुणाची बाजू सत्याची आहे? हे जाणून घेण्यासाठी सीडी प्रकरणाची चौकशी व्हावी, आणि रमेश जारकीहोळी स्वतः सीबीआय चौकशीसाठी प्रयत्न करत आहेत तर नक्कीच चौकशी व्हावी, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली.

आगामी विधानसभा निवडणुकीत जेडीएसमधून बेळगाव मतदार संघातील १८ ठिकाणी जेडीएस उमेदवार निवडणूक लढविणार असून जेडीएसमध्ये विविध पक्षातील अनेकजण समावेश करणार असल्याचे सी. एम. इब्राहिम म्हणाले. येथील स्थानिक उमेद्वारांसंदर्भात संपूर्ण माहिती आपल्याला नाही मात्र अनेकजण आपल्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले. बेळगावमधील विविध समाजाचा पाठिंबा घेऊन सर्वशक्तीनिशी प्रत्येक मतदार संघात जेडीएस विजय मिळविणार आहे, असा विश्वासही सी. एम. इब्राहिम यांनी व्यक्त केला.C m ibrahim

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर राष्ट्रीय पक्ष पैसे, भेटवस्तु आणि जेवणाची व्यवस्था करून जनतेला सभा-मेळाव्यांना आमंत्रित करत आहेत. मात्र या सर्व गोष्टी पुरवूनही सभेच्या ठिकाणी खुर्च्या रिकाम्या दिसत आहेत, अशा शब्दात त्यांनी खिल्ली उडविली. आपण १ रुपयाही खर्च न करता आपल्या सभेस हजारोंच्या संख्येने जनता सहभागी होत आहे.

एका बाजूने कुमारस्वामी आणि दुसऱ्या बाजूने आपण स्वतः मतदारांशी संपर्क साधण्यासाठी सभा घेत आहोत. यामुळे आगामी निवडणुकीत कुमारस्वामी मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असा ठाम विश्वास सी. एम. इब्राहिम यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.