बेळगाव लाईव्ह : मोठ्या प्रमाणात घरपट्टी थकविलेल्या बेळगाव शहरातील बड्या थकबाकीदारांची वीज आणि नळजोडणी तोडण्यात येणार आहे. थकबाकीदारांना तीन नोटीस बजावणे, तिन्ही नोटिसींना प्रतिसाद न दिल्यास त्यांची वीज व नळ जोडणी तोडण्याचा आदेश महापालिका आयुक्त डॉ. रूद्रेश घाळी यांनी महसूल विभागाला दिला आहे.
बड्या थकबाकीदारांत शहरातील काही शिक्षण संस्थांचाही समावेश आहे. त्यामुळे त्यांनाही आता नोटीस बजावली जाणार आहे. मनपा आयुक्त डॉ. घाळी यांनी बुधवारी महापालिकेची आढावा बैठक घेतली. त्यावेळी हा आदेश दिला. या वेळी त्यांनी काही शिक्षण संस्थांचा उल्लेख केला व त्यांच्यावर कारवाई करण्याची सूचना दिली.
शहरातील मिळकतींची केएमएफ २४ प्रणालीत नोंदणी करण्याच्या कामासह घरपट्टी वसुलीचेही काम सुरूच ठेवले पाहिजे. घरपट्टी वसुलीच्या कामाला प्राधान्य दिले पाहिजे असेही आयुक्तांनी सांगितले आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये महापालिका १०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले होते. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शहरातील शिक्षण संस्थांकडून व्यापारी दराने घरपट्टी वसूल करण्याचा आदेशही त्यांनी दिला होता.
त्यानंतर शहरातील शिक्षण संस्थांचे सर्वेक्षण महसूल विभागाने हाती घेतले होते. शिक्षण संस्थांकडून घरपट्टी वसूल करता येत नाही, त्यांच्याकडून २५ टक्के सेवाकर वसूल केला जातो. त्यामुळे महापालिका आयुक्तांच्या या निर्णयाच्या विरोधात शिक्षण संस्थांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे महापालिकेकडून सर्वेक्षण थांबविले होते. आता पुन्हा एकदा शिक्षण संस्थांकडूनच घरपट्टी वसुली करण्याचा आदेश दिला आहे.
महापालिकेने मोठ्या थकबाकीदारांची यादी तयार केली आहे. त्यांना महापालिकेकडून आता नोटीस बजावली जाणार आहे. तीनवेळा नोटीस बजावण्यात येणार आहे, या नोटीसीला प्रतिसाद मिळाला नाही तर संबंधित मिळकतीची वीज व नळ जोडणी तोडली जाणार आहे. आयुक्तांनीच अशी कारवाई करण्याची मुभा महसूल विभागाला दिली आहे.