Friday, July 19, 2024

/

झटपट सामन्यांच्या तुलनेत येथील सामने मोठे -रवी अहिरे

 belgaum

बेळगाव येथील या स्पर्धेचे आयोजन उत्कृष्ट असून प्रेक्षकांचा प्रतिसाद ही अफाट आहे. मात्र आमच्याकडे क्रिकेटचे 6 षटकांचे झटपट सामने होतात, इकडचे सामने 10 षटकांचे आहेत. त्यामुळे या स्पर्धेतील सामने आमच्यासाठी मोठे असणार आहेत, अशी प्रतिक्रिया नाशिकचा स्टार टेनिस बॉल क्रिकेटपटू रवी अहिरे यांनी व्यक्त केली. अहिरे हा आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेटपटू असून त्याने दुबईतील स्पर्धेत हजेरी लावली होती.

आमदार अनिल बेनके करंडक अखिल भारतीय भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आलेला रवी अहिरे आज शुक्रवारी बेळगाव लाईव्हशी बोलत होता. देशभरातील विशेष करून महाराष्ट्रातील स्टार टेनिस बॉल क्रिकेटपटू बेनके करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी शहरातील सरदार्स हायस्कूल मैदानावर हजेरी लावत आहेत. त्यामुळे बेळगावच्या क्रिकेटप्रेमींना पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात परगावच्या क्रिकेटपटूचा खेळ पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

या पार्श्वभूमीवर सरकार इलेव्हन गांधीनगर संघातून खेळण्यासाठी नाशिक महाराष्ट्रातून आलेल्या रवी अहिरेशी बेळगाव लाईव्हने संवाद साधला असता त्याने आपण प्रथमच बेळगावात आलो असल्याचे सांगून बेनके करंडक क्रिकेट स्पर्धा आणि येथील प्रेक्षकांबद्दल प्रशंसोद्गार काढले. स्वतःबद्दल आणि आपल्या संघ सहकाऱ्यांबद्दल माहिती देताना तो म्हणाला की, सरकार इलेव्हन संघातून खेळण्यासाठी माझ्यासह अक्षय पवार, बापू जगदाळे, सिक्बाल शेख, प्रतीक देवरे, मनोज जायभावे आदी महाराष्ट्रातील स्टार खेळाडू येथे आले आहेत. यापैकी अक्षय पवार हा मुंबईचा असून उर्वरित सर्वजण नाशिकचे आहेत.

प्रामुख्याने फलंदाज म्हणून मी स्वतः रत्नागिरीसह महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी स्पर्धा खेळलो आहे. दुबईतील शारजा स्टेडियममध्ये आयोजित स्पर्धेमध्ये देखील मी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. आमच्या नाशिकच्या संघाने मुंबई व रत्नागिरी येथील स्पर्धा जिंकण्याबरोबरच स्थानिक नाशिक परिसरातील अनेक स्पर्धांची जेतेपदं मिळवली आहेत.Ravi ahire cricket

लेदर बॉल आणि टेनिस बॉल क्रिकेटसंदर्भात बोलताना पूर्वी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला तितकेसे महत्त्व दिले जात नव्हते. मात्र आता लेदर बॉल प्रमाणे टेनिस बॉल क्रिकेटचा दर्जा व लोकप्रियताही वाढत आहे. त्यामुळे मोठमोठ्या स्पर्धांचे आयोजन केले जात आहे असे सांगून लेदर प्रमाणे यापुढे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील खेळाडूंना चांगले भवितव्य असणार आहे, असे अहिरे म्हणाला. महाराष्ट्रातील विशेषतः नाशिक मुंबई येथील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि बेळगावच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा यातील फरकाबद्दल बोलताना आमच्याकडे मर्यादित सहा षटकांचे झटपट सामने होतात मात्र इकडचे सामने 10 षटकांचे आहेत त्यामुळे आमच्यासाठी हे सामने मोठे असणार आहेत.

आम्ही अशा जादा षटकांचे सामने असलेल्या स्पर्धा फार कमी खेळल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. क्रिकेटमध्ये नावलौकिक मिळवायचा असेल तर शारीरिक तंदुरुस्ती राखून खूप सराव करा असा संदेशही नाशिकचा स्टार फलंदाज रवी अहिरे यांनी बेळगावच्या उदयोन्मुख टेनिस बॉल क्रिकेटपटूंना दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.