बेळगाव : गोवा सरकारने म्हादई प्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्याचा निर्णय घेतल्याने कर्नाटकचे जलसंपदा मंत्री यांनी म्हादईप्रश्नी निर्वाणीचे वक्तव्य केले असून येत्या वर्षभरात कळसा- भांडुरा प्रकल्प पूर्ण करून म्हादईचे पाणी कर्नाटकात वळवूच, असे न झाल्यास आपण आपले नाव बदलेन, असे विधान त्यांनी केले आहे.
राज्यात सुरु असलेल्या भाजप विजय बूथ अभियानाचे उद्घाटन केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना गोविंद कारजोळ यांनी म्हादई बाबत उपरोक्त विधान केले.
म्हादईचे पाणी वाळविण्यासाठी येत्या महिन्याभरात निविदा मागवून येत्या वर्षभरात हि योजना पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसे न झाल्यास मी माझे नाव गोविंद कारजोळ असे सांगणार नाही असेही ते म्हणाले.
या प्रकल्पाविरोधात काँग्रेस संशय व्यक्त करत असून या योजनेला केंद्रीय जलआयोगाची परवानगीच मिळाली नसल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. मंजुरीपत्रावर तारीख आणि शिक्का नाही असाही दावा काँग्रेसने केला असून आयोगाने मंजुरी दिल्याचे वास्तव काँग्रेसला नाकारता येणार नाही, असेही कारजोळ म्हणाले.
देशभरात बहुतांशी ठिकाणी भाजप सरकार कार्यरत असून एकीकडे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणि दुसरीकडे गोवा-कर्नाटकाचा म्हादईप्रश्नी सुरु असलेला वाद यावरून भाजप सरकारमध्येच संघर्ष होत असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. शिवाय भाजप सरकार असे मुद्दे पुढे करून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोपही नेटकरी करत आहेत.