Friday, March 29, 2024

/

समितीच्या वैशाली भातकांडे यांना उपमहापौर पदाची संधी?

 belgaum

बेळगाव महापालिकेमध्ये भाजपकडे बहुमत असले तरी येत्या 6 फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीत भाजपला महापौरपद मिळेल, पण उपमहापौर पद मिळणार नाही अशी स्थिती सध्या आहे. कारण उपमहापौर पद इतर मागास ‘ब’ प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे आणि याकरिता भाजपकडे उमेदवारच नाही. महापालिकेच्या एकूण नगरसेवकांमध्ये या प्रवर्गातील दोनच नगरसेविका असून त्यापैकी वैशाली भातकांडे या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आहेत, तर दुसऱ्या ज्योति राजू कडोलकर या काँग्रेसच्या आहेत.

सदर परिस्थितीमुळे वैशाली भातकांडे व ज्योती कडोलकर यांना भाजपमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते. तथापि सध्या तरी दोन्ही नगरसेविकांनी भाजपची ऑफर नाकारल्याची चर्चा आहे. उपमहापौर पदाचे आरक्षण बदलण्याचा देखील प्रयत्न सुरू असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र तसे झाल्यास विरोधी गटाकडून त्याला आक्षेप घेतला जाऊ शकतो. ओबीसी आरक्षणाला स्थगिती असताना बेळगाव महापौर व उपमहापौर निवडणूक घेतली जात आहे.

बेळगाव महापालिकेतील 58 नगरसेवकांपैकी 35 नगरसेवक भाजपचे आहेत. याखेरीज महापौर निवडणुकीत मतदान करणारे 7 पदसिद्ध सदस्यांपैकी 5 सदस्य भाजपचे आहेत. त्यामुळे भाजपचे संख्याबळ 40 आहे. परिणामी महापौर व उपमहापौर ही दोन्ही पदे भाजपला मिळू शकतात. मात्र आरक्षणामुळे भाजपची गोची झाली आहे. बेळगावचे महापौरपद सामान्य महिलेसाठी राखीव आहे. या प्रवर्गातील नगरसेविका भाजपकडे आहेत.Vaishali bhatkande

 belgaum

तथापी ओबीसी ‘बी’ महिला या प्रवर्गातील नगरसेविका भाजपकडे नाही. त्यामुळे यावेळी उपमहापौर निवडणुकीत रंगात येणार आहे. गेल्या सप्टेंबर 2021 मध्ये झालेल्या निवडणुकीत ओबीसी ‘बी’ महिला या प्रवर्गातून भाजपची एकही नगरसेविका निवडून आलेली नाही. त्यामुळे हे पद भाजपला सोडून द्यावे लागणार अशी स्थिती सध्या आहे.

भाजपने या पदावर पाणी सोडले तरी कडोलकर किंवा भातकांडे यापैकी कोणाला संधी मिळणार? भाजपकडून त्यांना मतदान केले जाणार का? विरोधी गटाकडून कडोलकर किंवा भातकांडे या दोघांपैकी एकाचीच उमेदवारी दिली जाणार का? असे प्रश्नही उपस्थित झाले आहेत. सध्या भातकांडे व कडोलकर या दोघांकडून उपमहापौर पदासाठी मोर्चे बांधणी सुरू झाली असून ज्योती कडोलकर या प्रभाग क्र. 3 च्या तर वैशाली भातकांडे या प्रभाग क्र. 10 च्या नगरसेविका आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.