महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्नी राष्ट्रपतींना हस्तक्षेपाची विनंती
महाराष्ट्र -कर्नाटक सीमा वादाच्या प्रकरणात आपण स्वतः हस्तक्षेप करून हा वाद कायमचा निकालात काढण्यासाठी भारत सरकारला आवश्यक कार्यवाहीची सूचना करावी, अशी विनंती लोकसभेतील दक्षिण -मध्य मुंबईचे शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी एका पत्राद्वारे खुद्द राष्ट्रपतींना केली आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये सुरू असलेल्या सीमा वादामुळे दोन्ही राज्या दरम्यान मोठा तणाव निर्माण झाला आहे. आपल्याला कल्पना आहे की या दोन्ही राज्यातील सीमा वादाचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
दोन्ही राज्यातील या सीमा वादात महाराष्ट्राची भूमिका नेहमी सकारात्मक राहिली आहे. मात्र बेळगावमध्ये अराजकता निर्माण करणाऱ्या कांही संघटना आणि कांही राजकीय पक्ष जाणीवपूर्वक तणावाची परिस्थिती निर्माण करत आहेत, जे निंदनीय आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन्ही राज्यातील सीमावाद शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत.
सदर विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन बाळासाहेबांच्या शिवसेना संसदीय गटातर्फे मी आपल्याला विनंती करतो की गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात सुरू असलेल्या या सीमा वादाच्या प्रकरणात आपण स्वतः वैयक्तिकरित्या लक्ष घालावे.
तसेच हा वाद कायमचा निकालात काढण्यासाठी भारत सरकारला आवश्यक कार्यवाहीची सूचना करावी, अशा आशयाचा तपशील लोकसभेतील शिवसेना नेते खासदार राहुल शेवाळे यांनी आदरणीय राष्ट्रपतींना धाडलेल्या पत्रात नमूद आहे.