Friday, April 26, 2024

/

महामेळावा यशस्वी करण्याचा वज्रनिर्धार

 belgaum

महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा प्रकट करण्यासाठी तसेच कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या निषेधार्थ येत्या 19 डिसेंबर रोजी आयोजित मराठी भाषिकांचा महामेळावा यशस्वी करण्यासाठी समितीच्या प्रत्येक घटक समितीने आपापल्या भागात जनजागृती करावी आणि मेळाव्याला जास्तीत जास्त नागरिक उपस्थित राहतील याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आज झालेल्या बैठकीत करण्यात आले.

मराठी भाषिकांच्या महामेळाव्यासंदर्भात आज मंगळवारी दुपारी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक मराठा मंदिर येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर हे होते. बैठकीमध्ये मेळावा यशस्वी करण्याच्या दृष्टीने चर्चा झाली.

महाराष्ट्रातील सर्व पक्षांचे अध्यक्षांना त्यांचे प्रतिनिधी महामेळाव्याला उपस्थित राहण्यास पाठवावेत अशी विनंती करण्यात आली आहे. मात्र अद्यापपर्यंत कोणी होकार वगैरे कळविलेला नाही, परंतु पोलिसांना आम्ही अशाप्रकारे महाराष्ट्रातील राजकीय पक्षांचे प्रतिनिधी येणार असल्याची कल्पना दिली असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

 belgaum

सीमाभागातील मराठी साहित्य संमेलनांमध्ये सीमाप्रश्न अथवा मराठी भाषिकांसंदर्भात ठराव करताना त्यामध्ये केंद्र शासितचा उल्लेख करू नये अशी विनंती बैठकीत करण्यात आली. केंद्रशासित ठराव करण्याऐवजी सीमाभागातील मराठी जनतेला न्याय द्यावा किंवा सीमाभागाचा महाराष्ट्रात समावेश करावा असा एक ओळीचा ठराव आयोजकांनी करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

खानापूर तालुक्यात महाराष्ट्र एकीकरण समितीचे दोन गट कार्यरत होते, ते बरखास्त करण्यात आलेले नाहीत असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. तसेच या दोन्ही गटातून चार -चार लोकांना घेऊन समितीची नवी कार्यकारणी स्थापण्याची सूचना करण्यात आली. यासाठी संबंधित चार प्रतिनिधींची नावे मध्यवर्तीय समितीकडे देण्याची विनंती करण्यात आली. त्याचप्रमाणे खानापुरातील समितीचे दोन्ही गट पूर्वीप्रमाणे कार्यरत राहतीलच असेही स्पष्ट करण्यात आले. याखेरीस महामेळाव्याचा मंडप घालण्यासाठी प्रत्येक समितीने आपल्या काही कार्यकर्त्यांची नावे खजिनदार प्रकाश मरगळे यांच्याकडे द्यावीत, अशी सूचना करण्यात आली.Mes meeting

अध्यक्षीय भाषणात मनोहर किणेकर यांनी कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन सीमावासियांच्या विरोधात आहे. त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी आहे. कर्नाटक सरकार आमचे घटनात्मक हक्क डावलून कन्नड सक्ती करत आहे. मराठी भाषा संपवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यालाच आम्ही या महामेळाव्याच्या माध्यमातून विरोध दर्शवण्याचे काम करत आहोत असे सांगून यावर्षीचा हा महामेळावा यशस्वी करण्यासाठी कोणत्याही प्रकारची कचुराई केली जाणार नाही असे स्पष्ट केले. बैठकीच्या प्रारंभी ज्येष्ठ मराठी अभिनेते दिवंगत विक्रम गोखले यांच्यासह कै. सुलोचना चव्हाण, कै. डॉ कोतापल्ले तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीशी संबंधित दिवंगताना श्रद्धांजली वाहण्यात आली. मनोहर किनेकर यांच्यासह सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, प्रकाश मरगाळे, रवींद्र पाटील, ॲड. राजाभाऊ पाटील, यशवंत बिर्जे, धनंजय पाटील, रणजीत चव्हाण -पाटील, एम. जी. पाटील इत्यादींनी बैठकीतील चर्चेत भाग घेतला. माजी नगरसेवक रणजीत चव्हाण -पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले. बैठकीस मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी यांच्यासह अन्य पदाधिकारी सदस्य तसेच बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती आणि खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

दरम्यान, बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक उद्या बुधवार दि. 14 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता रंगूबाई भोसले पॅलेस रामलिंगखिंड गल्ली बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. तरी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि युवकांनी वेळेवर हजर राहावे, असे आवाहन शहर म. ए. समितीने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.