बेळगाव – सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी बेळगावकरांनी केली आहे. विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याबरोबरच शहर परिसरात ठिकठिकाणी ‘ओल्ड मॅन’ उभे करण्यात आले आहेत.
2023 या नव्या वर्षाचे जल्लोषी स्वागत करण्याबरोबरच सरत्या वर्षाला निरोप देताना आज 31 डिसेंबरच्या रात्री वाईट प्रवृत्तींचा नाश व्हावा यासाठी ओल्ड मॅनचे दहन केले जाणार आहे. पूर्वी गल्लीतील युवक हौसेपोटी एकत्र येऊन ओल्ड मॅन तयार करत असत. मात्र अलीकडच्या काळात या हौसेने व्यावसायिक स्वरूप धारण केले असून गेल्या कांही वर्षापासून तयार ओल्ड मॅन विक्रीसाठी बाजारात उपलब्ध होऊ लागले आहेत. त्यासाठी दरवर्षीप्रमाणे बेळगाव शहरात विशेष करून कॅम्प परिसरात अनेक ठिकाणी ओल्डमॅनच्या प्रतिकृती तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले होते.
हे काम आता पूर्ण झाले असून तयार ओल्ड मॅन प्रतिकृतींवर अखेरचा हात फिरवला जात आहे. शहरात ठीकठिकाणी आज रात्री ओल्ड मॅनचे दहन केले जाणार आहे. दरवर्षी प्रमाणे गवळी गल्ली येथील जीजीवायएम या मंडळातर्फे यावर्षी देखील ओल्ड मॅन उभा केला आहे. गेल्या दोन वर्षापासून कोरोनाची दहशत लक्षात घेऊन त्यांनी 25 फूट उंचीचा कोरोना विषाणूचा ओल्ड मॅन उभा केला आहे. सदर ओल्ड मॅन तयार करण्यासाठी गवळी गल्लीतील मुलांना सहा -सात दिवस लागल्याचे त्यांच्यापैकी एकाने बेळगाव लाईव्हशी बोलताना सांगितले. तसेच गवळी गल्ली येथे गेल्या 20 -25 वर्षापासून ओल्ड मॅन उभा केला जातो आणि 31 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजता त्याचे दहन केले जाते अशी माहिती त्याने दिली. त्याचप्रमाणे ओल्ड मॅन तयार करून त्याची विक्री करणाऱ्या विकास कब्बूर या मुलाने आपण पाच ते पंधरा फूट उंचीपर्यंत तयार करतो असे सांगितले.
त्याचप्रमाणे त्यांचे दर उंचीनुसार 500 पासून पाच हजार रुपये पर्यंत असल्याची तसेच गोव्यातूनही आपल्या ओल्ड मॅनना मागणी असल्याची माहिती दिली. शहरात सध्या शक्तिमान, क्रिश तसेच अन्य व्यक्तिरेखांचे विविध उंचीचे ओल्ड मॅन विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
कॅम्प येथील कांबळे व मोरे कुटुंबीय दरवर्षी विविध प्रकारचे आणि उंचीचे ओल्ड मॅन तयार करून त्यांच्या विक्रीचा व्यवसाय करतात. सदर कुटुंबातील सर्व सदस्य 31 डिसेंबरजवळ येऊ लागला की एकत्रितपणे ओल्ड मॅन तयार करण्याच्या कामाला लागतात.
सदर कुटुंबातील एका मुलाने दिलेल्या माहितीनुसार क्रिश, मोटू पतलू, व्हॅम्पायर, टॉम अँड जेरी वगैरे विविध प्रकारचे आणि वेगवेगळ्या उंचीचे ओल्ड मॅन तयार केले जातात. त्यानुसार यंदा देखील ते तयार करण्यात आले आहेत. ऑर्डरनुसार सध्या त्यांनी तयार केलेल्या ओल्ड मॅन मधील व्हॅम्पायर ओल्ड मॅन 12 फुटाचा तर पिकब लेंडर्स ओल्ड मॅन 15 फूट उंचीचा आहे. ओल्ड मॅन तयार करण्यासाठी गवत, बांबू, रट्ट, तट्ट, वृत्तपत्रं आणि घोटीव कागदांचा वापर केला जातो.
कांबळे व मोरे कुटुंबाकडील विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या ओल्ड मॅनचे दर 4, 7, 12 व 15 फुटाच्या ओल्ड मॅनसाठी अनुक्रमे 900 रु., 3000 रु., 5000 रु, व 6000 रुपये इतके आहेत. कांबळे व मोरे कुटुंबीयांकडून प्रसिद्ध व्यक्तिरेखांचे ओल्ड मॅन तर बनविले जातातच शिवाय ग्राहकांच्या मागणीनुसार ओल्ड मॅन तयार करून दिला जातो.