बेळगाव लाईव्ह : विधानपरिषदेचे ज्येष्ठ भाजप सदस्य बसवराज होरट्टी यांची विधानसभा सभापतिपदी सलग तिसऱ्यांदा निवड झाली आहे. बसवराज होरट्टी यांची वरिष्ठ सभागृहाचे नवे सभापती म्हणून एकमताने निवड करण्यात आली.
गेली चार दशके सातत्याने विधानपरिषद सदस्यपदी विराजमान असलेले बसवराज होरट्टी हे जून ते डिसेंबर २०१८ या कालावधीत पहिल्यांदा सभापती म्हणून काम पहात होते. त्यानंतर फेब्रुवारी २०२१ ते मे २०२२ या कालावधीत त्यांनी दुसऱ्यांदा आणि यंदा तिसऱ्यांदा राज्य विधान परिषदेचे अध्यक्ष बनून एक नवा विक्रम नोंदवला आहे. तिसऱ्यांदा विधानसभा सभापतिपदी निवड झाल्याने त्यांची हि हॅट्रिक म्हणावी लागेल. बसवराज होरट्टी यांची निवड झाल्यानंतर त्यांनी रामकृष्ण हेगडे, देवेगौडा, एस.आर, बोम्मई, एच. डी. कुमारस्वामी, येडियुरप्पा यासारख्या अनेक राजकीय गुरुंचे स्मरण केले. आपल्या राजकीय प्रवासात कणा म्हणून उभ्या राहिलेल्या राजकीय गुरूंचे स्मरण करत आपल्या निवडीचे श्रेय त्यांनी शिक्षकांना दिले.
विधानपरिषदेची आज सकाळी बैठक झाली यावेळी कार्यवाह रघुनाथ मलकापुरे यांनी सभापती पदासाठी निवडणूक प्रक्रियेस परवानगी दिली. भाजप सदस्य डॉ. वाय. ए. नारायणस्वामी, डॉ. तेजस्विनीगौडा, शांताराम बुदनासिद्दी, ए. देवेगौडा यांनी बसवराज होरट्टी यांची विधान परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करावी, अशी सूचना केली.
सत्ताधारी पक्षाचे सदस्य अयानूर मंजुनाथ, एस.व्ही. संकनूर आणि प्रदीप शेट्टर यांनी निवडणूक प्रस्तावाला मंजुरी दिली. सभापतींच्या अध्यक्षस्थानी असलेले रघुनाथ मलकापुरे यांनी ठराव मांडला आणि तो एकमताने मंजूर करण्यात आला.
सायंकाळी ४ च्या सुमारास विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली असून उपसभापतीपदाची निवडणूक २३ डिसेंबरला होणार आहे. उद्या दुपारी १२ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे.