विमानतळ विस्तारीकरणासंदर्भात खासदार मंगला अंगडी यांची काल शुक्रवारी बेळगाव विमानतळाला भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून यामुळे सांबरा येथे भूसंपादनाची टांगती तलवार कायम राहिली आहे.
बेळगावच्या खासदार मंगला अंगडी यांनी काल शुक्रवारी सांबरा विमानतळाला भेट दिली. त्यानंतर बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य तसेच जि. पं. मुख्य अभियंता आणि अन्य अधिकाऱ्यांच्या ताफ्यासमवेत त्या सांबरा स्मशानभूमी येथे गेल्या. या ठिकाणी झालेल्या चर्चेत बेळगाव विमानतळापासून 150 मीटर अंतरावर असलेली घरे आणि त्यापुढे असलेल्या शेत जमिनीच्या भूसंपादनाबाबत चर्चा झाली.
भूसंपादनात येणारी घरे आणि स्मशानभूमी संबंधीही यावेळी चर्चा करण्यात आली. यापूर्वी विमानतळाचे विस्तारीकरण करताना जुनी स्मशानभूमी संपादित करण्यात आल्यामुळे या नव्या स्मशानभूमीसाठी 6 एकर जागा सोडण्यात आली आहे. मात्र ही जागा विमानतळाच्या संरक्षण भिंतीला लागूनच असल्यामुळे ती नव्या भूसंपादनाच्या कक्षेत येत आहे.
सदर जागा ग्रामपंचायतकडे अद्याप हस्तांतरित झालेली नाही अशी माहिती अधिकाऱ्यांनी खासदार अंगडी यांना दिली. त्यामुळे स्मशानभूमीची संबंधित जागा देखील भूसंपादनात जाणार हे स्पष्ट होत आहे.
सांबरा येथील बेळगाव विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा द्यावयाचा झाल्यास सध्याची जी 2300 मीटर लांबीची धावपट्टी आहे ती आणखी 900 मीटर म्हणजे 3200 मीटर इतकी वाढवावी लागणार आहे. विमानतळाच्या परिसरात आणखी भूसंपादन झाल्यास घरे देखील संपादित करावी लागणार आहेत. त्यामुळे तेथील नागरिकांना पुन्हा एकदा भूसंपादनाला सामोरे जावे लागणार आहे.