Wednesday, January 1, 2025

/

बेळगाव विमानतळावर लवकरच आयएलएस यंत्रणा

 belgaum

बेळगाव विमानतळ (सांबरा -आयएक्सजी) एकेकाळी 1942 मध्ये सांगलीच्या पटवर्धन सरकारांच्या अखत्यारित होते. त्यावेळी 1942 मध्ये त्यांनी सांबरा विमानतळावर रॉयल एअर फोर्स आरएएफ केंद्र स्थापनेस परवानगी दिली होती. आजच्या घडीला म्हणजे नोव्हेंबर 2022 मध्ये देशातील 10 प्रमुख शहरांना जोडल्या गेलेल्या या विमानतळावर लवकरच आयएलएस यंत्रणादेखील कार्यान्वित होणार आहे.

बेळगाव विमानतळ सध्या स्पाइस जेट विमानसेवेद्वारे दिल्लीला, स्टार एअर विमानसेवेद्वारे सुरत, अहमदाबाद, जोधपुर, मुंबई, नागपूर, इंदोर आणि तिरुपतीला तर इंडिगो विमान सेवेद्वारे हैदराबाद आणि बेंगलोरला जोडले गेले आहे. सुदैवाने बेळगाव विमानतळाला दोन एफटूओ अर्थात फ्लाईंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन देखील मंजूर झाले आहेत. यापैकी एक मेसर्स रेड बर्ड फ्लाईंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूटकडून चालविले जाणार आहे. या एफटूओच्या स्थापनेचे काम पूर्ण झाले असून या वर्षाखेर या ठिकाणी प्रत्यक्ष वैमानिक प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे.

बेळगाव विमानतळावरील दुसरे एफटूओ अर्थात वैमानिक प्रशिक्षण केंद्र मेसर्स सॅमवर्धने टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडकडून चालविले जाणार आहे. जे बहुदा पुढील वर्षात कार्यरत होणार आहे. एखाद्या वेळेस विमानतळावर स्फोटक आढळल्यास ती निकामी करण्यासाठी कूलिंग पीटच्या निर्मितीचे काम सध्या हाती घेण्यात आले असून या विमानतळावर लवकरच इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम (आयएलएस) देखील बसविली जाणार आहे. विमानांची देखभाल, दुरुस्ती (एमआरओ) वगैरेंसाठी हँगर आणि ॲप्रॉन उभारणीचे काम येत्या डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात हाती घेण्यात येणार आहे. या कामाचे कंत्राट नवी दिल्लीच्या मेसर्स एव्हिएशन कनेक्टिव्हिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रा. लि. यांना देण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच बेळगाव विमानतळावर इआरजे 145, लेगसी 650, फाल्कन 7 एक्स, चॅलेंजर 605 इत्यादी विमानांची देखभाल आणि दुरुस्तीचे काम केले जाणार आहे.

गेल्या एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये बेळगाव विमानतळावरून प्रवास केलेले प्रवासी आणि विमान फेऱ्या यांची संख्या पुढील प्रमाणे आहे. एप्रिल : प्रवासी 34689 विमान फेऱ्या 546, मे : प्रवासी 34301 विमान फेऱ्या 589, जून : प्रवासी 32940 विमान फेऱ्या 556, जुलै : प्रवासी 25943 विमान फेऱ्या 494, ऑगस्ट : प्रवासी 23145 विमान फेऱ्या 485, सप्टेंबर : प्रवासी 22566 विमान फेऱ्या 472, ऑक्टोबर : प्रवासी 27262 विमान फेऱ्या 522.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.