सुपीक जमीन नष्ट करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा बेळगावचा नियोजित रिंगरोड प्रकल्प तात्काळ रद्द करावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य चाबूक मोर्चा काढून बेळगाव शहर व तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज सोमवारी आपल्या संघटनात्मक शक्तीचे विराट प्रदर्शन घडवले. तसेच कोणत्याही परिस्थितीत आपल्या पिकाऊ शेत जमिनी रिंग रोडसाठी देणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला.
रिंग रोडच्या विरोधात बेळगाव तालुका आणि शहर परिसरातील समस्त शेतकऱ्यांची एकवटलेली ताकद आजच्या चाबूक मोर्चातून प्रकट होत होती.
बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये अगसगा, आंबेवाडी, बाची, बहाद्दरवाडी, बेळगुंदी, कडोली, काकती, बिजगर्णी, गोजगे, होनगा, शगनमट्टी, शिंदोळी, कलखांब, कल्लेहोळ, कमकारट्टी, कणबर्गी, कोंडोसकोप्प, मण्णूर, मास्तमार्डी, मुचंडी, मोदगा, नावगे, संतीबस्तवाड, सोनट्टी, सुळगे -येळळूर, धामणे, तुरमुरी, उचगाव, वाघवडे, येरमाळ व झाडशहापुर या रिंग रोडच्या पट्ट्यात येणाऱ्या 32 गावांमधील शेतकऱ्यांसह तालुक्यातील समस्त शेतकऱ्यांचा सहभाग होता.
सदर मोर्चा फक्त शेतकरी आणि त्यांचा परिवारच नव्हे तर विद्यार्थ्यांसह अबालवृद्ध सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे आजी -माजी लोकप्रतिनिधींसह महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवसेना, श्रीराम सेना हिंदुस्तान, युवा समिती, विविध संघ -संस्था व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला देखील मोठ्या संख्येने मोर्चा सामील झाले होते. या पद्धतीने शेतकऱ्यांसमवेत हजारोंच्या संख्येने लोक मोर्चाला उपस्थित राहिल्यामुळे मोर्चाचा मार्ग फुलून गेला होता. मोर्चाच्या अग्रभागी टाळांच्या तालावर धनगरी ढोल वादन करण्याबरोबरच शेतकरी रस्त्यावर चाबूक वाजवून रिंग रोड विरोधातील आपला रोष प्रकट करताना दिसत होते.
सदर मोर्चादरम्यान नाही नाही कदापि नाही आमची शेती देणार नाही, रद्द करा रद्द करा रिंग रोड रद्द करा वगैरे घोषणा देऊन मोर्चातील शेतकऱ्यांनी परिसर दणाणून सोडला होता. विशेष करून शेतकऱ्यांची मुले, विद्यार्थी -विद्यार्थिनी मोर्चात अग्रभागी पहावयास मिळत होती. रिंग रोड हटाव शेतकरी बचाव, शेतकरी टिकेल तर देश टिकेल, शेतकरी विरोधी धोरणाचा धिक्कार असो यासारखे रिंग रोड विरोधी फलक हातात धरून ही मुले देखील पोट तिडकीने घोषणाबाजी करताना दिसत होती. श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, राजू मरवे आदी शेतकरी नेते खांद्यावर चाबूक घेऊन या बालगोपाळांचे प्रेरणास्थान बनले होते.
मोठ्या पोलीस बंदोबस्तात शहरातील धर्मवीर संभाजी चौकातून निघालेल्या या मोर्चाच्या मार्गावर ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. मोर्चात निषेधाचे फलक व बॅनर लावलेले ट्रॅक्टरही सहभागी होते. धर्मवीर संभाजी चौक येथून हा विराट चाबूक मोर्चा कॉलेज रोड, चन्नम्मा सर्कल मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. त्या ठिकाणी मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. या सभेत नेतेमंडळींची भाषणे झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.