रोटरी इंटरनॅशनल फाउंडेशनच्या सहकार्याने रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगाव आणि रोटरी क्लब ऑफ ऊडब्रिज यूएसए यांच्यातर्फे घटप्रभा येथील कर्नाटक हेल्थ इन्स्टिट्यूट (केएचआय) येथे स्थापण्यात आलेल्या नुतन रोटरी केएचआय डायलिसिस सेंटरचा उद्घाटन समारंभ शुक्रवार दि. 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
सदर समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे माजी प्रांतपाल रो. गौरिश एम. धोंड उपस्थित राहणार आहेत. तसेच केएचआयचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. घनश्याम वैद्य रोटरीचे जिल्हा प्रांतपाल रो. व्यंकटेश देशपांडे, डीजीएन रो. शरद पै आणि रोटरी वेणूग्रामचे अध्यक्ष रो. उमेश रामगुरवाडी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
रोटरी इंटरनॅशनल फाउंडेशनच्या सहकार्याने रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगाव रोटरी प्रांत 3170 आणि रोटरी क्लब ऑफ ऊडब्रिज यूएसए रोटरी प्रांत 7980 यांच्यातर्फे घटप्रभा येथील कर्नाटक हेल्थ इन्स्टिट्यूट (केएचआय) येथे उपरोक्त नूतन डायलिसिस सेंटर सुरू करण्यात येत आहे. केएचआय ही एक धर्मादाय संस्था असून जी जनतेला परवडणाऱ्या माफक दरात अथवा वेळप्रसंगी अत्यावश्यक असल्यास मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देते.
ग्रामीण भागातील जनतेसाठी असलेली केएचआयची उपलब्धता या ठिकाणी रेल्वे आणि रस्ते मार्गे असलेली चांगली दळणवळणाची सोय हे लक्षात घेऊन रोटरीकडून या ठिकाणी डायलिसिस सेंटर सुरू करण्यात येत आहे. रोटरीच्या अरविंद खडबडी यांच्या प्रयत्नातून ग्रामीण भागातील जनतेसाठी डायलिसिस सुविधा उपलब्ध होणार आहे. रोटरीचा हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी खडबडी यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.
समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना देखील मूत्रपिंडाच्या आजाराशी संबंधित डायलेसिस उपचार मिळाले पाहिजेत. या उद्देशाने या डायलेसिस सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. ग्रामीण भागात परवडणाऱ्या दरातील तपासणी केंद्र नसते. त्यामुळे आजाराची प्राथमिक वैद्यकीय तपासणी होतच नाही. यासारख्या परिस्थितीत निकामी मूत्रपिंडांमुळे रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यासाठी सातत्यपूर्ण डायलेसिस प्रक्रियेची गरज असते. या सर्व बाबी ध्यानात घेऊन ग्रामीण भागातील लोकांना चांगल्या वैद्यकीय सेवा सुविधा विशेष करून डायलिसिस प्रक्रिया उपलब्ध व्हावी यासाठी केएचआय येथील डायलिसिस सेंटरसाठी निधी मंजूर करण्यात आला. त्यातून या सेंटरची उभारणी करण्यात आली आहे.
केएचआय अर्थात कर्नाटक हेल्थ इन्स्टिट्यूट ही संस्था गेल्यासमारे 75 वर्षापासून गोरगरीब रुग्णांना अत्यंत माफक परवडणाऱ्या दरात वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात अग्रणी आहे. अत्यंत गरजू लोकांसाठी धर्मादाय वैद्यकीय सेवा देणारी संस्था म्हणून केएचआयचा नावलौकिक आहे. केएचआय मधील नूतन डायलिसिस सेंटरमध्ये प्रारंभी सुमारे 70 रुग्णांवर डायलिसिस उपचार केले जातील. त्यानंतर गरजेनुसार या संख्येमध्ये आणखी 20 ते 25 गरजू लोकांचा समावेश केला जाणार आहे.