गेल्या दहा दिवसांपासून सुरु असलेल्या गणेशोत्सव काळात कायदा, सुव्यवस्था आणि शांतता राखण्यात पोलीस विभागाने महत्वपूर्ण जबाबदारी पेलली आहे. उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार न घडता उत्सव काळात पोलीस विभागाने आवश्यक ती सर्व जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली आहे. यासंदर्भात एकता युवक मंडळाने खडे बाजार पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर यांचा सत्कार केला.
प्रभाग क्रमांक १०मधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ भांदूर गल्ली, पाटील मळा, मुजावर गल्ली, ताशिलदार गल्ली, रामा मेस्त्री अड्डा, संभाजी गल्ली, कांगली गल्ली आदींच्या माध्यमातून पोलीस निरीक्षक,उपनिरीक्षकांचा सत्कार करण्यात आला.
दहा दिवस उत्सव सुरळीत पार पाडून श्रीमूर्ती विसर्जन मिरवणुकीत देखील पोलीस विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. मिरवणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घेण्यात आलेली खबरदारी, नियोजन, तसेच उत्सव काळात आणि मिरवणुकीदरम्यान कोणतेही गालबोट न लागू देता उत्सव उत्साहात, शांततेत आणि सुरळीतपणे पार पाडण्यात पोलीस विभागाकडून मिळालेल्या सहकार्याचे यावेळी आभार मानण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मानही करण्यात आला.
यावेळी नगरसेविका वैशाली भातकांडे, सिद्धार्थ भातकांडे, विनायक कांगले, अभिषेक सरनोबत, प्रदीप उचगावकर, प्रितेश मालकाचे राहुल मन्नूरकर, नागेश यळ्ळूरकर, राहुल चव्हाण, ईश्वर नाईक आदींसह अनेक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.