राज्य सरकारने सर्व सरकारी खात्यांसाठी जारी केलेली ज्योती संजीवनी योजना आपल्यालाही लागू करावी या मागणीसाठी बेळगाव महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ‘काम बंद’ आंदोलन छेडल्याची घटना आज बुधवारी सकाळी घडली.
सरकारची ज्योती संजीवनी योजना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना देखील लागू करण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन छेडत आज बुधवारी बेळगाव महापालिकेचे कर्मचारी रस्त्यावर उतरले. आपल्या मागणीच्या पूर्ततेसाठी विविध विभागातील नेहमीचे कार्यालयीन काम बंद ठेवून महापालिकेसमोर मोठ्या संख्येने एकत्र जमा झाले हे स्त्री -पुरुष कर्मचारी साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते.
राज्य सरकारने सर्व सरकारी खात्यांमधील कर्मचाऱ्यांसाठी ज्योती संजीवनी योजना सुरू केली आहे. तथापि राज्यातील 10 महानगरपालिकांना मात्र या योजनेपासून वंचित ठेवण्यात आले आहे. महापालिका कर्मचाऱ्यांसाठी ही योजना अतिशय लाभदायक असल्यामुळे अन्य सरकारी खात्यांप्रमाणे राज्यातील बेळगावसह संबंधित 10 महापालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी देखील ही योजना लागू करावी, अशी आमची मागणी आहे.
ज्योती संजीवनी योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना जवळपास सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत. संजीवनी कार्डमुळे सरकारी कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा वैद्यकीय उपचारांचा 1 लाखापासून सुमारे 15 ते 20 लाखापर्यंतचा खर्च सरकार उचलते.
हे कार्ड जर आम्हाला मिळाल्यास आमची चांगली सोय होणार आहे, असे आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी बेळगाव लाईव्हशी बोलताना सांगितले.