लोकांच्या जीविताला आणि धरणांना निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन खाण आणि भूगर्भशास्त्र खात्याने जिल्ह्यातील 13 क्वारींवर तात्पुरती बंदी घातली आहे. जोपर्यंत सरकारच्या अटींचे पालन केले जात नाही तोपर्यंत या क्वाऱ्या बंद ठेवण्यात येणार आहेत.
बैलहोंगल तालुक्यातील मरीकट्टी आणि गनिकोप्प या गावांच्या परिसरात दगडांचा चुरा करणाऱ्या 13 क्वारी आहेत. या क्वाऱ्यांच्या ठिकाणी केल्या जाणाऱ्या जिलेटिनच्या स्फोटामुळे परिसरातील घरे, शेतपीक आणि धरणांसह नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता.
त्याचप्रमाणे जवळच असलेल्या तिगडी गावातील हरिनाला येथील पाणीसाठा त्याचप्रमाणे गावकरी वापरत असलेला अरुंद रस्ता क्षतिग्रस्त होण्याची शक्यता निर्माण झाली होती. याबाबत प्रसिद्धी माध्यमांनी जोरदार आवाज उठवल्यामुळे खाण व भूगर्भशास्त्र खाते खडबडून जागे झाले आहे.
खाण व भूगर्भशास्त्र खात्याने काल मंगळवारी या संदर्भात कारवाई करताना संबंधित 13 दगड फोडणाऱ्या क्वाऱ्यांवर तात्काळ तात्पुरती बंदी घातली आहे. जोपर्यंत सरकारच्या अटींचे पालन केले जात नाही तोपर्यंत या क्वाऱ्या बंद ठेवण्यात येणार आहेत. सदर क्वाऱ्या बंद करण्याबरोबरच खाण व भूगर्भशास्त्र खात्याने हुबळी इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनी अर्थात हेस्कॉमला या क्वाऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची सूचना केली आहे.
या खेरीज लोकायुक्त अधिकाऱ्यांनी याप्रकरणी गांभीर्याने लक्ष घातले असून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या क्वाऱ्यांची चौकशी हाती घेतली आहे. बेळगाव लोकायुक्त अधिकाऱ्यांनी सदर क्वाऱ्या आणि परिसरातील गावांना भेट देऊन पाहणी केली. तसेच नुकसानीचे मूल्यांकन केले आहे.