आजचे युवक आणि विद्यार्थी हे स्वतंत्र आणि समृद्ध भारताची संपत्ती आहे असे प्रतिपादन डी सी पी पी.व्ही.स्नेहा यांनी केले.
“आझादी का अमृतमहोत्सव” अंतर्गत जायंट्स सखी आयोजित देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.प्रत्येकाने स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करत नवसंकल्पांसाठी सामाजिक कार्यात पुढे येण्याची त्यांनी विनंती केली. आज आपण स्वतंत्र भारतात श्वास घेत आहोत, त्यामागे भारतमातेच्या लाखो लोकांचे त्याग, बलिदान, आणि भारतमातेला स्वतंत्र बनवण्याप्रती त्यांचा संकल्प, अशा सर्व आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचे, स्वातंत्र्यवीरांचे, शहीदांना वंदन करण्यासाठी त्यांच्या त्यागाची आठवण म्हणून गेले वर्षभर भारत सरकारच्या वतीने आझादी का अमृतमहोत्सव हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
त्यानुसार आज जायंट्स सखीने आयोजित केलेल्या देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेमध्ये आपण भाग घेऊन देशप्रेम जागृत केलंत त्याबद्दल सहभागी विद्यार्थ्यांचे पी व्ही स्नेहा यांनी अभिनंदन केले.
येथील लोकमान्य रंगमंदिर मध्ये संपन्न झालेल्या स्पर्धेच्या बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या म्हणून बेळगावच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या पोलीस आयुक्त पी.व्ही.स्नेहा, जायंट्स सखीच्या अध्यक्षा चंद्रा चोपडे, जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक विठ्ठलराव याळगी, लोकमान्य सांस्कृतिक केंद्राचे प्रमुख अनिल चौधरी, जायंट्सचे जागतिक विशेष समिती सदस्य मोहन कारेकर, फेडरेशन संचालक मदन बामणे, सचिव सुलक्षणा शिनोळकर,माजी अध्यक्षा निता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
सुरुवातीला उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक संस्थापक अध्यक्षा ज्योती अनगोळकर यांनी केले त्यानंतर अनिल चौधरी, मदन बामणे,नितीन कपिलेश्वरी यांनी आपले विचार व्यक्त करत असताना जायंट्स सखीच्या उपक्रमाचे कौतुक केले.
अध्यक्षा चंद्रा चोपडे यांनी अध्यक्षीय भाषण करतना सर्व सहभागी शाळांचे आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.
देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धां ‘ अत्यंत उत्साही वातावरणात पार पडल्या,त्यात विसहून अधिक शाळांमधून ३००पेक्षा जास्त स्पर्धकांनी यात भाग घेतला.
या अटीतटीच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक एमव्ही हेरवाडकर इंग्लिश माध्यम शाळा, द्वितीय क्रमांक ज्ञान प्रबोधन शाळा तर तृतीय क्रमांक महिला विद्यालया मराठी माध्यमाच्या शाळेने पटकावला.उत्तेजनार्थ बक्षीस मराठी विज्ञानिकेन शाळा आणि सेन्ट मेरीज शाळेला देण्यात आले.तर माहेश्वरी अंध शाळेला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते प्रथम क्रमांक रोख चार हजार रुपये, द्वितीय क्रमांक रोख अडीच हजार रुपये,तृतीय क्रमांक रोख दीड हजार रुपये उत्तेजनार्थ प्रत्येकी एक हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह,प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.
राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
स्पर्धेचे परीक्षण नितीन कपिलेश्वरी, स्वाती हुद्दार आणि किरण जोरापूर यांनी केले.हा भव्यदिव्य उपक्रम यशस्वी करण्यासाठी जायंट्स सखीच्या पदाधिकारी आणि सर्वच सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन डॉ मधुरा गुरव यांनी तर आभार सचिव सुलक्षणा शिनोळकर यांनी केले.