सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी विविध विभागांची परवानगी घेण्यासाठी महापालिका कार्यालयामार्फत उद्या बुधवार दि. 24 ऑगस्टपासून युद्धपातळीवर ‘एक खिडकी’ सुविधा सुरळीत उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी व महापालिका प्रशासक नितेश पाटील यांनी बेळगाव सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्या शिष्टमंडळाला दिले आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवासाठी प्रशासनाच्या विविध विभागाकडून परवानगी देण्यासाठी महापालिकेमार्फत एक खिडकी सुविधाची घोषणा करण्यात आली आहे. तथापि अद्याप ती कार्यान्वित झाली नसल्याने सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्या शिष्टमंडळाने आज सायंकाळी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची तातडीने भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी उपरोक्त आश्वासन दिले. शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना विविध विभागांची परवानगी एकाच ठिकाणी मिळावी यासाठी शहरातील आठ पोलीस स्थानकांमध्ये महापालिकेमार्फत ‘एक खिडकी’ सुविधा उपलब्ध करण्यात आली असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तथापि गणेशोत्सव तोंडावर आला असताना संबंधित ठिकाणी एका विभागाचे प्रतिनिधी आहेत तर दुसऱ्या विभागाचे नाहीत अशी अनागोंदी परिस्थिती आहे. त्यामुळे गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली.
झेंडा चौक येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ हे लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले बेळगावातील पहिले सर्वात जुने गणेशोत्सव मंडळ आहे. या मंडळाचे कार्यकर्ते आज दिवसभरात दोन वेळा विकास कलघटगी यांच्या नेतृत्वाखाली मार्केट पोलीस स्थानकातील एक खिडकी सुविधेच्या ठिकाणी विविध विभागाची परवानगी घेण्यासाठी गेले होते.
तथापि त्या ठिकाणी महापालिकेचा एक कारकून वगळता पोलीस, हस्कॉम आदी अन्य विभागांचा एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हता. याबाबत कार्यकर्त्यांनी जाब विचारला असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. विकास कलघटगी यांनी सदर प्रकार आज सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटी प्रसंगी कथन केला. तसेच मार्केट पोलीस स्थानकाप्रमाणे अन्य ठिकाणच्या एक खिडकी सुविधेच्या ठिकाणी थोड्याफार फरकाने हीच परिस्थिती असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांच्या कानावर घातले.
एक खिडकीसंदर्भात कलघटगी आणि शिष्टमंडळातील अन्य सदस्यांच्या तक्रारींची दखल घेऊन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी तात्काळ मनपा आयुक्त डॉ. घाळी यांच्याशी संपर्क साधून एक खिडकी सुविधा युद्धपातळीवर सुरळीत सुरू करण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे उद्यापासून एक खिडकी सुविधा व्यवस्थितपणे कार्यान्वित होईल असे आश्वासन दिले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करणाऱ्या शिष्टमंडळात रमाकांत कोंडुसकर, विकास कलघटगी, बाबूलाल राजपुरोहित, रणजीत चव्हाण -पाटील, गणेश दड्डीकर, महादेव पाटील, सतीश गौरगोंडा, राजेंद्र हंडे आणि दीपक पावशे यांचा समावेश होता.