राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आज राष्ट्रीय पातळीवर उत्तम कामगिरी केलेल्या पाच क्रीडापटूंचा सत्कार बेळगाव लाईव्ह आणि तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती युवा आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
किर्लोस्कर रोड येथील मराठा समाजाच्या जात्तीमठ देवस्थानात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बेळगावमधील ऍथलिटस तुषार भेकने, जलतरणपटू स्वरूप धनुचे, कुस्तीपटू राधिका बस्तवाडकर, ऍथलेट्स जाफरखान सरावर आणि कराटेपटू वैभवी मोरजकर या पाच क्रीडापटूंचा समावेश होता. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक गुणवंत पाटील, बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष संतोष मंडलिक, रेल्वे अधिकारी, बॉडी बिल्डिंग कोच सुनील आपटेकर, बेळगाव लाईव्हचे संपादक प्रकाश बेळगोजी आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात खेळाडूंप्रमाणेच मिस्टर इंडिया रेल्वे बॉडी बिल्डिंग कोच सुनील आपटेकर, डीआयएसच्या प्रशिक्षिका एनआयएस रोहिणी पाटील, कुस्ती प्रशिक्षिका स्मिता पाटील आणि वरिष्ठ खोखो प्रशिक्षक विजय परांजपे यांचा सत्कार करण्यात आला. याचप्रमाणे राष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंचा शाल, मानचिन्ह आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात बोलताना संतोष मंडलिक म्हणाले, प्रत्येकाने फिनिक्स पक्षाप्रमाणे ध्येय बाळगावे, ज्यापद्धतीने राखेतून भरारी घेत फिनिक्स पक्षी मोठी झेप घेतो त्याप्रमाणे प्रत्येक खेळाडूने अपयशाचा विचार न करता आपल्या ध्येयाच्या दिशेने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
ज्येष्ठ साहित्यिक गुणवंत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि, कोणत्याही गावाचे, शहराचे नाव कर्तृत्ववान माणसांमुळे मोठे होते. अशा कर्तृत्ववान नागरिकांना व्यासपीठ आणि प्रोत्साहन उपलब्ध करून देण्यासाठी समाजाने पुढाकार घेणे महत्वाचे आहे. आपल्या गावचे नाव मोठे होण्यासाठी खेळाडूंनीही मोठे झाले पाहिजे. याअनुषंगाने सर्वांनी प्रयत्न करावेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत प्रकाश बेळगोजी यांनी केले तर रवी बेळगुंदकर यांनी सूत्रसंचलन केले. माणिक होनगेकर यांनी आभार मानले. यावेळी दत्ता उघाडे, दीपक पावशे, चेतन पाटील, मयूर बसरीकट्टी, मनोहर संताजी,राजू किणेकर, कांतेश चलवेटकर, यांच्यासह युवा आघाडीचे कार्यकर्ते,खेळाडूंचे पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.