बेळगावचे बेळगावी असे नामांतर केल्यानंतर आता त्याचे लोण बेळगाव तालुक्यातील गावांसह शहरातील महत्त्वाच्या चौकापर्यंत पोहोचले असून शहरातील चौकांच्या नामांतराचा घाट रचला जात आहे. याचाच एक भाग म्हणून आरपीडी क्रॉस या शहरातील जुन्या चौकाचे नांव बदलण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे.
बेळगावचे बेळगावी केल्यानंतर प्रशासन अर्थात कर्नाटक शासनाकडून बेळगाव सीमा भागातील जुनी ओळख, पाऊल खुणा आणि मराठीचा स्पर्श असलेले रस्ते, चौक, गावांची नावे बदलण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या कृतीचा सीमावासीयांकडून निषेध केला जात आहे. गोवावेस सर्कल, कोल्हापूर सर्कल, कॉलेज रोडचे नाव बदलले असले तरी त्याला जनतेचा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे त्यांची जुनी ओळख पुसली गेली नाही हा भाग वेगळा असला तरी त्यामागील कृती ही आक्षेपार्ह आहे.
आरपीडी क्रॉस या नावाने संबंधित चौकाची ओळख फार जुनी आहे. पत्रव्यवहार वाहतूक सेवा आणि इतर व्यवहार हे याच नावाने चालतात. मात्र या चौकाची ओळख पुसण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. वीर मदकरी नायक यांचे नांव चौकाला देण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. महापालिकेने तसा प्रस्ताव तयार करत नागरिकांचे आक्षेप मागविले आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नागरिकांकडून आलेल्या हरकतींवर कार्यवाही करून शासनाकडे प्रस्ताव दिला जाईल. त्यानंतर शासनाच्या या संदर्भातील सूचना लक्षात घेऊन पुढील कार्यवाही केली जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या बुधवारी झालेल्या बैठकीतही या विषयावर चर्चा झाली आहे.
दरम्यान, आरपीडी क्रॉसचे नांव बदलण्याची तयारी सुरू झाली असून आक्षेप नोंदवण्यासाठी 15 दिवसाची मुदत देण्यात आली आहे. यादरम्यान अधिकाधिक आक्षेप नोंदवण्याची गरज असून मराठी भाषिक संघटनांनी याची दखल घेण्याची मागणी केली जात आहे.