बेळगाव महानगरपालिकेतील रोजंदारी पौरकार्मिकांना अनेक वर्षे काम करूनही नोकरीत कायम करण्यात आलेले नाही. तेंव्हा सदर पौरकार्मिकांना सेवा आहर्ततेच्या आधारे तात्काळ नोकरीत कायम करावे, या मागणीसाठी शहरातील पौरकारमिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडून निवेदन सादर केले.
महापालिकेच्या पौरकार्मिकांनी जिल्हाधिकारी तथा बेळगाव महापालिकेचे प्रशासक नितेश पाटील यांच्याकडे उपरोक्त मागणी केली आहे. आपल्या मागणीच्या पूर्ततेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बहुसंख्येने जमा झालेल्या पौरकार्मिकांनी जोरदार निदर्शने केली. निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलनकर्त्या पौरकार्मिकांना उद्देशून बोलताना जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले की, नोकरीत कायम करावे या मागणीसाठी पौरकार्मिकांचे फक्त बेळगावातच नाही तर राज्यभरात आंदोलन सुरू आहे.
शासनाने याची दखल घेतली असून पौरकार्मिकांना सेवेत कायम करून घेण्याची प्रक्रिया नुकतीच सुरू झाली आहे. बेळगाव मधील 133 पौरकार्मीक सध्या नोकरीत कायम आहेत. लवकरच उर्वरित पौर्वकारमिकांना सेवा आहर्ततेच्या आधारे नोकरीत कायम केले जाईल.
आम्हाला अजून 1500 पौरकार्मिकांची गरज असून सध्या फक्त 133 जण काम करत आहेत. पौरकार्मिकांनी काम बंद आंदोलन छेडून कचऱ्याची साफसफाई केली नसल्यामुळे शहरात कचरा वाढला आहे.
तेंव्हा लवकरात लवकर या कचऱ्याची साफसफाई केली जावी, असे आवहनही जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करतेवेळी महासफाई कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक दीपक वाघेला, कार्यवाह विजय निरगट्टी, मुनीस्वामी भंडारी, एस. एन. आदीयांद्र, मालती सक्सेना आदींसह महापालिकेचे सफाई कामगार अर्थात पौरकार्मीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.