ग्रामीण आणि दुर्गम भागातील जनावरांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळावे त्यासाठी बेळगावसह सात जिल्ह्यांसाठी मंजूर करण्यात आलेल्या 82 फिरत्या पशुचिकित्सालयांचा लोकार्पण सोहळा आज मंगळवारी सकाळी सुवर्ण विधानसौध येथे उत्साहात पार पडला.
सुवर्ण विधानसौध येथे आज सकाळी राज्याचे पशुसंगोपन मंत्री प्रभू चव्हाण यांच्या हस्ते गोमातेचे पूजन करण्याद्वारे फिरत्या पशु चिकित्सालयांचा लोकार्पण सोहळा पार पडला. याप्रसंगी जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांच्यासह स्थानिक आमदार उपस्थिती होते. मंत्री चव्हाण यांच्यासह उपस्थित प्रमुख मान्यवरांनी हिरवा ध्वज दाखवून फिरत्या पशुचिकित्सालयांचा शुभारंभ केला.
यावेळी पशुसंवर्धन मंत्री प्रभू चव्हाण म्हणाले, “प्रत्येक जिल्ह्यात एक गोशाळा बांधण्याची कारवाई करण्यात येणार आहे. त्यांनी शेतकऱ्यांनी गायींना कत्तलखान्यात पाठवण्याऐवजी गोठ्यात पाठवावे, असे आवाहन केले. तसेच गोवंश हत्या बंदी कायदा लागू करण्यात आला आहे. राज्यात काटेकोरपणे पालन केले आहे. या संदर्भात यापूर्वी 20 हजार गायींची सुटका करून त्यांना गोठ्यात पाठवले आहे. गोवंश हत्या बंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर मी 900 गुन्हे दाखल करून कारवाई केली आहे, असे ते म्हणाले.
लोक अडचणीत असल्यास 108 वर कॉल करा आणि गुरेढोरे अडचणीत असल्यास 1962 वर कॉल करा. राज्यात जनावरांच्या उपचारासाठी 275 मोबाईल उपचार युनिट मंजूर करण्यात आले आहेत. पशुपक्षी तसेच लोकांच्या रक्षणासाठी आमचे सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही मंत्री प्रभू चव्हाण यांनी दिली.
उत्तर कर्नाटकातील सात जिल्ह्यातील 82 फिरत्या पशु चिकित्सालयांपैकी बेळगावात 17, हावेरी 9, बागलकोट 13, धारवाड 8, कारवार 13, विजयपूरा 14, हावेरी 9, गदग 8 या पद्धतीने ही पशुचिकित्सालयं आजपासून रस्त्यावर धावणार आहेत.
या फिरत्या शुचिकित्सालयांमुळे दुर्गम भागातील पशुपालकांच्या जनावरांनाही आता घरच्याघरी उपचार मिळणार आहेत. याखेरीस जनावरांच्या आरोग्यासंबंधी तक्रारी तातडीने मार्गी लागणार आहेत. या फिरत्या पशुचिकित्सालय वाहनांच्या माध्यमातून गावोगावी फिरवून जनावरांना आरोग्याच्या सुविधा दिल्या जाणार आहेत. कृत्रिम गर्भधारणा, लसीकरण, औषधोपचार आणि इतर सुविधा उपलब्ध होणार आहेत. या पशुचिकित्सालय सुविधेचा लाभ घेण्यासाठी 1962 या टोल फ्री क्रमांकावर पशुपालकांनी कॉल करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शिक्षण, शहरीकरण आणि रोजगाराच्या दबावामुळे अलीकडे शेतकऱ्यांची मुले शेती आणि पशुपालनाबाबत निरुत्साह दाखवत आहेत. याचा परिणाम म्हणून देशातील लोकसंख्येच्या तुलनेत पशुधन संगोपनाचे प्रमाण १/३ वर घसरत असल्याची चिंता जिल्हा प्रभारी मंत्री गोविंदा कारजोळ यांनी व्यक्त केली.