Friday, April 19, 2024

/

उचगाव स्वागत कमानीवरील मराठी हटवण्याच्या हालचाली

 belgaum

बेळगावसह सीमा भागात पुन्हा एकदा कन्नडचा वरवंटा फिरवण्याचा घाट घातला जात असून उचगाव येथील स्वागत कमानीवरील मराठी मजकूर हटविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. कन्नडच्या या दडपशाहीचा मराठी भाषिकांकडून धिक्कार केला जात आहे.

बेळगावमध्ये कन्नड सक्तीसाठी जोरकस प्रयत्न सुरू झाले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये काल झालेल्या बैठकीत शहर व जिल्ह्यामध्ये व्यापारी संकुलांसह दुकानांच्या पाट्या येत्या पंधरा दिवसात कन्नडमध्ये लिहिल्या जाव्यात त्यांची कार्यवाही न करणाऱ्या व्यापारी संकुल आणि दुकानांचा परवाना रद्द करण्यात यावा व नूतनीकरण थांबवावे या आशयाचा अजब फतवा कन्नड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष टी. एस. नागभरण यांनी बजावला आहे. तसेच उचगाव वेशीवरील स्वागत कमानीचा फलक कन्नडमध्ये लिहावा असा अतिशहाणपणाचा सल्लाही आहे दिला आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव ग्रामीणच्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने आज मंगळवारी उचगाव ग्रामपंचायत सदस्यांची बैठक बोलावली होती.

उचगाव वेशीवर ‘श्री मळेकरणी देवस्थान ग्रामपंचायत उचगावकडून आपले सहर्ष स्वागत -2019’ असा मजकूर असलेली स्वागत कमान आहे. आज बोलावलेल्या बैठकीत संबंधित पोलीस अधिकाऱ्याने वेशीवरील मराठीतील स्वागत कमान तुम्हीच उभारली आहे, तेंव्हा तुम्हीच ती उतरवावा, असा अनाहूत सल्ला दिल्याचे समजते. त्यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्यांनी गावकऱ्यांच्या संमती शिवाय आम्ही स्वतंत्रपणे कोणताही निर्णय घेऊ शकत नाही असे सांगितले. तेंव्हा संबंधित अधिकाऱ्याने स्वागत कमानीवरील मराठी भाषेतील मजकूर कन्नडमध्ये लिहिण्यासाठी 4 दिवसांची मुदत दिली असल्याचे सांगण्यात आले.

 belgaum
Uchgaon board
Uchgaon marathi wel come board

दरम्यान, यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी येत्या गुरुवारी गावकऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. सदर बैठकीत गावच्या वेशीवरील स्वागत कमानीवरील मजकुराचा मुद्दा मांडण्यात येणार आहे. बैठकीत गावकऱ्यांचे मत अजमावून अंतिम निर्णय घेतला जाणार असल्यामुळे गावकऱ्यांचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे.

कन्नड विकास प्राधिकरण अध्यक्षपदी निवड होऊन तीन वर्षे लोटलेल्या टी. एस. नागभरण पहिल्यांदा दोन दिवसांच्या बेळगाव दौऱ्यावर आले. त्यावेळी त्यांनी विविध स्वरूपाचे अनाठही फतवे काढत स्वतःचे हसे करून घेतले होते. उचगावची स्वागत कमान मराठीत आहे या विरोधामध्ये कन्नड संघटनाने गरळ ओकल्यानंतर तेथे आता कन्नडचा वरवंटा फिरवला जावा, या आशयाच्या सूचना त्यांनी केल्या आहेत.

दरम्यान निपाणी, अथणी, चिकोडी आदी ठिकाणी अद्यापही मराठी भाषेतील फलक कायम आहेत. त्याकडे दुर्लक्ष करून जाणूनबुजून येळ्ळूर आणि उचगाव या गावांना कन्नड सक्तीसाठी लक्ष्य केले जात असल्याचा आरोप केला जात आहे. त्याचप्रमाणे अशा परिस्थितीत गावकऱ्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधींची ठोस भूमिका महत्त्वाचे ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. त्यामुळे आता उचगाव स्वागत कमानीच्या बाबतीत लोकप्रतिनिधी कोणती भूमिका घेतात? हे पहावे लागणार आहे.

उचगाव ग्रामपंचायतच्या तत्कालीन अध्यक्षा योगिता बाळासाहेब देसाई यांच्या कार्यकाळात त्यांनी मराठी बाणा दाखवत हा फलक स्वागत कमान फलक बसवला होता तोच मराठी बाणा सध्याचे ग्रामपंचायत सदस्य दाखवतील का? त्यामुळे गुरुवारी याबाबतीत ग्रामस्थांचे विचार जाणून घेण्यासाठी बैठक होणार आहे त्या बैठकीत काय होणार? ग्रामस्थ  या फलका बाबत काय भूमिका घेणार याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.