खानापूर तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे खानापूर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राला पुराचा धोका निर्माण झाला असून आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना तात्काळ हाती घ्याव्यात, अशी विनंती एका पत्राद्वारे खानापूर तालुका प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यांनी खानापूर तहसीलदार व नगरपालिका मुख्याधिकारी यांना पत्र लिहून मुसळधार पावसामुळे प्रशिक्षण केंद्र परिसराला पुराचा धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
याची तात्काळ दखल घेऊन उपाययोजना हाती घ्याव्यात अशी विनंती केली आहे. त्याचप्रमाणे संभाव्य पुरामुळे स्थलांतराची परिस्थिती निर्माण झाल्यास प्रशिक्षणार्थी पोलिसांची नजीकच्या कल्याण मंडप, समुदाय भवन आदींमध्ये व्यवस्था केली जावी अशा आशयाचे निवेदन खानापूर तहसीलदारांना देण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षापासून खानापुरातील मलप्रभा नदीला पूर येऊन पोलीस प्रशिक्षण केंद्र पूरग्रस्त बनत आहे.
सध्या या प्रशिक्षण केंद्राला पुराचा धोका नसला तरी मुसळधार पाऊस असाच कोसळत राहिला तर या ठिकाणी कोणत्याही क्षणी पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते.
यासाठी खबरदारीचे उपाय आत्तापासून हाती घेणे आवश्यक आहे, अशा आशयाचा तपशील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यांनी खानापूर तालुका प्रशासनाला लिहिलेल्या पत्रात नमूद आहे.