तिरंगा ध्वज हा केवळ काठी व कापडाचा नसून त्याला मोठा इतिहास आहे. लाखो देशवासीयांच्या त्यागातून त्याची निर्मिती झाली आहे. तो देशाची शान व अभिमान आहे. यासाठी राष्ट्रध्वज पाॅलिस्टरचा बनविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला जनतेने विरोध केला पाहिजे, असे प्रतिपादन गांधीवादी अशोकभाई देशपांडे यांनी केले.
शहरातील प्रगतिशील लेखक संघाच्या गिरीश काँप्लेक्समधील शहीद भगतसिंग सभागृहात शुक्रवारी झालेल्या साप्ताहिक बैठकीत देशपांडे बोलत होते. प्रा. आनंद मेणसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत राष्ट्रध्वजाबाबत घेतलेल्या नव्या निर्णयावर चर्चा करण्यात आली. प्रारंभी प्रा. मेणसे यांनी विषयाची मांडणी केली.
बैठकीत बोलताना देशपांडे यांनी तिरंगा ध्वजाच्या निर्मितीचा सविस्तर इतिहास सांगितला. हातात तिरंगा ध्वज घेऊन व वंदे मातरम् म्हणत लाखो लोकांनी स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतला. त्यांनी इंग्रज पोलिसांचा लाठीमार सहन केला. असंख्य लोकांनी प्राणाची आहुती दिली. त्यांच्या त्यागातून तिरंगा ध्वज निर्माण झाला. 1905 पासून स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या भगिनी निवेदिता, मँडम कामा, लोकमान्य टिळक आदीनी 22 वेळा सुचविलेल्या दुरुस्त्यानुसार तिरंगा ध्वज निर्माण झाला.
त्याचा आकार कसा असावा, तो कसा व केंव्हा फडकवावा याचे कांही नियम आहेत. पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. आपल्या राष्ट्रध्वजाला कोणत्याही धर्माचा आधार नाही. त्यातील केसरी रंग हा ‘त्यागाचा’ पांढरा रंग ‘शांततेचा’ व हिरवा रंग हा ‘समृध्दीचा’ आहे. मधल्या भागातील चक्र हे प्रगतीचे प्रतिक आहे, असे अशोकभाई देशपांडे यांनी सांगितले.
बैठकीचे औचित्य साधून 75 व्या वाढदिवसानिमित्त लेखक संघाचे मार्गदर्शक ॲड. नागेश सातेरी यांचा अशोकभाई देशपांडे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. बैठकीस कामगार नेते जी. व्ही. कुलकर्णी, प्रा. दत्ता नाडगौडा, कृष्णा शहापूरकर, शिवलिला मिसाळे, ॲड. अजय सातेरी, मधु पाटील, प्रा. अमित जडये, सुभाष कंग्राळकर, संदीप मुतगेकर, किर्तीकुमार दोसी, सागर मरगाण्णाचे, गायत्री गोणबरे, दीपिका जाधव, शामल तुडयेकर, अर्जुन सागावकर, महेश राऊत, श्रीकांत कडोलकर आदी सदस्य उपस्थित होते.