आषाढी एकादशीसाठी बेळगाव जिल्ह्याबरोबरच इतर जिल्ह्यातूनही मोठ्या संख्येने वारकरी व भाविक पंढरपूरला जातात. त्यासाठी बंद असलेली पंढरपूरची दैनंदिन रेल्वे पूर्ववत सुरू करण्याबरोबरच 8 ते 13 जुलै दरम्यान अतिरिक्त रेल्वेची सोय करावी, अशी मागणी बेळगाव सिटीझन्स कौन्सिलने नैऋत्य रेल्वेच्या हुबळी विभागाचे महाव्यवस्थापक संजीव किशोर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
बेळगाव सिटीझन्स कौन्सिलचे अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपरोक्त मागणीचे निवेदन गुरुवारी बेळगाव रेल्वे स्थानकाचे स्टेशन मॅनेजर पी. नागराज यांच्याकडे सादर केले. यावेळी तेंडुलकर यांनी आपल्या मागणी संदर्भात नागराज यांच्याशी चर्चा करून पंढरपूरसाठी अतिरिक्त रेल्वेची किती आवश्यकता आहे याची माहिती दिली. निवेदन स्वीकारून नागराज यांनी ते त्वरित महाव्यवस्थापकांकडे धाडण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.
यापूर्वी बेळगावहून पंढरपूरला दररोज एक रेल्वे जात होती. मात्र मध्यंतरी कोरोनामुळे पंढरपूरची वारी थांबली होती. तसेच रेल्वे देखील प्रारंभी कोरोना आणि त्यानंतर रेल्वे मार्ग दुपदरीकरणामुळे बंद करण्यात आली आहे. कोरोना निवळल्यामुळे यावर्षी पंढरपूरची आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी होणार असून दोन वर्षानंतर भावीकीही त्यासाठी आतुर झाले आहेत.
त्यामुळे भाविक आणि वारकऱ्यांच्या सोयीसाठी तातडीने नियोजन करून अतिरिक्त रेल्वे या काळात सुरू करावी. त्याचप्रमाणे देशात सर्वत्र पॅसेंजर रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत मात्र लोंढा ते मिरज ही पॅसेंजर रेल्वे बंद आहे. ती पूर्ववत तातडीने सुरू करावी. या खेरीज पूर्वीप्रमाणे पंढरपूरला दररोज जाणारी रेल्वे देखील सुरू करण्यात यावी.
हुबळी -धारवाडसह बेळगाव जिल्ह्यातून वारकरी आणि भाविक मोठ्या संख्येने आषाढी एकादशीला जाणार आहेत. तेंव्हा युद्धपातळीवर 8 जुलैपासून त्यांच्यासाठी रेल्वेची सोय करावी आणि वारकऱ्यांना पंढरपूरला जाण्यास मदत करावी. पंढरपुर येथील आषाढी एकादशीसाठी शेतकरी आणि कामगार वर्गासह ज्येष्ठ नागरिक देखील मोठ्या संख्येने पंढरपूरला जातात.
त्यांचा हा प्रवास सोयीचा आणि 50 ते 60 रुपये इतक्या कमी खर्चात होत असतो. त्यासाठी आषाढी एकादशीच्या काळात रेल्वे सुरू करण्याबरोबरच कायमस्वरूपी पंढरपूरला दररोज एक रेल्वे सुरू करावी, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे. निवेदन सादर करतेवेळी सिटीझन्स कौन्सिलचे अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांच्यासह अरुण कुलकर्णी, शेवंतीलाल शहा, एस. सुरेश आदी कौन्सिलचे सदस्य उपस्थित होते.