Thursday, April 25, 2024

/

खुनांचे वाढते प्रकार पोलिसांसमोरील आव्हान…

 belgaum

गेल्या 15 ते 20 वर्षांपूर्वी बेळगावात टोळीयुद्ध भडकले होते. त्यावेळी कोणाचा मुडदा कोठे पडेल याचा नेम नसायचा. गेल्या दोन-तीन महिन्यात घडलेल्या खुनांच्या घटना लक्षात घेता पुन्हा बेळगावात तशी परिस्थिती निर्माण झाली असून यापैकी बहुतेक घटनांना गांजा व पन्नीची नशा कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. यापैकी बहुतांश घटनांच्या तपासाचे आव्हान पोलिसांसमोर कायम आहे.

गेल्या दोन ते तीन महिन्यांमध्ये बेळगाव शहरांमध्ये ज्या मारामारीच्या आणि खुनाच्या घटना घडल्या आहेत त्यावरून बेळगाव शहर परिसर हा ‘मर्डर झोन’ बनला आहे का? असा प्रश्न या निमित्ताने जनता उपस्थित करू लागली आहे. शहरात घडणाऱ्या अनेक घटनांचे कारण रियल इस्टेट किंवा जमीन वाद आहे त्यामुळे अश्या सगळ्या घटनांवर नियंत्रण करण्यासाठी पोलीस दल कमी पडत आहे का? पोलिसांचा वचक कमी झाला आहे का यावर देखील विचार करण्याची वेळ आली आहे. काही काळी बेळगावात टोळीयुद्ध असायची मात्र पोलिसांनी ती टोळी युध्द मारामाऱ्या अलीकडच्या काळात मोडून काढल्या होत्या मात्र अलीकडच्या किरकोळ घटनांमुळे बेळगावात गुन्हेगारी वाढली आहे त्यामुळे पोलिसांची ही चिंता नक्कीच वाढली आहे.

गेल्या दोन-तीन महिन्यात बेळगाव शहर परिसरात अंदाजे 7 जणांचे खून झाले आहेत. सुपारी घेऊन खून करणाऱ्या गुन्हेगारांच्या अनेक टोळ्या बेळगाव परिसरात कार्यरत आहेत. वेळोवेळी या टोळ्यांचे कंबरडे मोडण्याची जबाबदारी पोलिसांची असते. तथापि बेळगावची पोलिस यंत्रणा अलीकडे प्रसंगानुरूप भूमिका घेत असल्याचा आरोप आहे. साहजिकच पोलिसांबाबतची भीती नाहीशी होऊन गुन्हेगारांचे मनोबल वाढल्याचे गेल्या दोन-तीन महिन्यातील खुनांच्या घटनांवरून लक्षात येते.

 belgaum

गेल्या मार्च महिन्यात भवानीनगर येथील राजू दोड्डभोम्मन्नावर या रिअल इस्टेट व्यावसायिकाचा मंडोळी रोडवर डोळ्यात मिरची पूड टाकून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले. शुल्लक कारणावरून वादावादी होऊन पंत बाळेकुंद्री स्पिनिंग मिलनजीक एकाचा खून करण्यात आला. त्यानंतर किल्ला तलावाजवळ गांधीनगरच्या हिनाकौसर मंजूरइलाही नदाफ या विवाहितेचा तिच्या पतीने भररस्त्यात कोयत्याने वार करुन खून करण्याचा प्रकार घडला. एप्रिल महिन्यामध्ये येरमाळ रोड वडगाव येथील शंकर ऊर्फ बाळू मारुती पाटील या गवंडी कामगाराचा खून झालेल्या अवस्थेतील मृतदेह नाझर कॅम्प वडगाव येथील चिल्ड्रन्स पार्कमध्ये आढळला होता. गळा चिरून त्याचा खून करण्यात आला होता.Crime news logo

पुढे सूळगा येळ्ळूरच्या शिवारात खून झालेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. प्रारंभी ओळख पटवून शकलेला हा मृतदेह जवळच झुडपात आढळलेल्या पर्समधील आधार कार्ड वरून मंड्या जिल्ह्यातील के. आर. पेठेतील ए. कुमार या युवकाचा असल्याचे स्पष्ट झाले. गेल्या मे महिन्यात ज्ञानेश्वर कामाण्णाचे या विजयनगर, हलगा येथील मेकॅनिक युवकाचा खून करण्यात आला. क्षुल्लक वादावादी वरून ज्ञानेश्वरचा त्याच्या आई वडिलांसमोर जांबियाने वार करून खून केला गेला. आता गेल्या शनिवारी रात्री गौंडवाड येथे सतीश राजेंद्र पाटील या तरुणाचा आणि तत्पूर्वी कंग्राळी बुद्रुक येथे अन्य एकाचा खून झाला.

या पद्धतीने खुनांच्या घटनांची एकंदर मालिका पाहता समाजात पोलीस आणि कायद्याचा धाक आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे तीन राज्यांच्या सीमेवर बसलेले बेळगाव मारेकर्‍यांना सुरक्षित ठिकाण वाटते का? अशीही शंका उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.