Thursday, April 18, 2024

/

25 वर्षांनी दिला ‘बालपणीच्या आठवणीना उजाळा’

 belgaum

सांबरा (ता. जि. बेळगाव) येथील सरकारी आदर्श पूर्ण प्राथमिक मराठी शाळेतील इयत्ता सातवीच्या 1996 -97 सालातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आणि गुरुजनांचा आदर सोहळा काल शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला.

शाळेच्या सभागृहामध्ये आयोजित सदर सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी 1997 सालच्या सातवीतील विद्यार्थ्यांच्या वर्गशिक्षिका श्रीमती जयश्री माने या होत्या. प्रारंभी सर्वप्रथम तत्कालीन माजी गुरुजनांच्या उपस्थित ग्रामदेवता श्री दुर्गा मातेची पूजा करण्यात आली. त्यानंतर शाळेच्या आवारात गुरुजनांचे जल्लोषी स्वागत करून त्यांना व्यासपीठावर स्थानापन्न करण्यात आले. कार्यक्रमाला प्रारंभ करण्यापूर्वी दिवंगत शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.

याप्रसंगी व्यासपीठावर माजी शिक्षक देसाई सर, श्रीमती भोसले टीचर, एस. एफ मेहेत्री सर, श्रीमती सुगंधा किल्लेकर, श्रीमती चिगरे टीचर, श्रीमती सोकार टीचर, मेणसे सर आणि मारुती चिंगळे सर उपस्थित होते. याखेरीज प्रमुख पाहुणे म्हणून एसडीएमसी अध्यक्ष सचिन अष्टेकर व उपाध्यक्ष श्रीमती सुमन गिरमल व्यासपीठावर हजर होते.

 belgaum

प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर व्यासपीठावरील गुरुजनांचा इयत्ता सातवीच्या 1996 -97 सालच्या बॅचमधील माजी विद्यार्थी -विद्यार्थिनींच्यावतीने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. गुरुजनांचा सत्काराबरोबरच भारतीय संरक्षण दलात आणि सरकारी सेवेत असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

सांबरा सरकारी आदर्श पूर्ण प्राथमिक मराठी शाळेतील इयत्ता सातवीच्या 1996 -97 सालातील माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींची 105 जणांची बॅच ही आत्तापर्यंतची शाळेतील सर्वात मोठी बॅच आहे. त्याकाळी फक्त एका सातवी इयत्तेमध्ये इतकी मुले होती. आज या मराठी शाळेची अशी अवस्था आहे की संपूर्ण शाळेमध्ये जेमतेम 200 विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत.Sambra students

सांबरा शाळेमध्ये आयोजित या स्नेहमेळाव्यास माजी विद्यार्थ्यांपैकी दिवंगत झालेले पाच जण वगळता उर्वरित स्थानिक व परगावी असलेले सर्व माजी विद्यार्थी -विद्यार्थिनी स्वतःच्या कामातून आवर्जून वेळ काढून उपस्थित होते हे विशेष होय. तब्बल 25 वर्षांनी एकत्र आलेल्या या सर्वांनी यावेळी शाळेतील बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.

पुनर्रमिलनाच्या या रौप्य महोत्सवानिमित्त सदर माजी विद्यार्थ्यांनी शाळेची आवार भिंत रंगवून देण्याबरोबरच मुलांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे म्हणून शाळेला स्टीलची मोठी ॲक्वागार्ड टाकी भेटी दाखल दिली.
याप्रसंगी एसडीएमसी सदस्यांसह शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता. स्नेहमेळाव्याचे सूत्रसंचालन अरुण डुमरकी यांनी केले, तर शेवटी सविता यड्डी यांनी सर्वांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.