ढगाळ वातावरणासह पावसाला सुरुवात झाल्यामुळे आज मंगळवारी दुपारी चार सव्वाचारच्या सुमारास म्हणजे 3 तास आधीच अंधार पडण्यास सुरुवात होऊन शहरामध्ये संध्याकाळ सदृश्य वातावरण निर्माण झाल्याचा अनुभव नागरिकांना आला.
आज मंगळवारी दुपारी सव्वा चार साडेचारच्या सुमारास इतके ढगाळ वातावरण निर्माण झाले की सायंकाळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली.
अंधाराच्या सावटामुळे भरदुपारी वाहनाचे दिवे लावून वाहन चालकांना आपली वाहने हाकावी लागत होती. त्याचप्रमाणे बाजारपेठेमध्ये देखील बहुतांश दुकानासमोरील दर्शनीय फलकांवरील लाईट लावण्यात आले होते. दिवसाढवळ्या सायंकाळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे दुकानदारांना दुकानातील दिवे लावून व्यवहार करावे लागत होते. जाणकारांच्या मते कित्येक वर्षानंतर पहिल्यांदाच बेळगावात भर दुपारच्या वेळी या पद्धतीने सायंकाळ सदृश्य अंधाराचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान ढगाळ वातावरणासह सोसाट्याचा वारा सुटून दुपारी साडेचार नंतर पावसाने देखील हजेरी लावली. त्यामुळे छत्री रेनकोट विना घराबाहेर पडलेल्या नागरिकांसह बाजारपेठेतील रस्त्याकडेला विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची एकच तारांबळ उडाली. दुचाकी वाहनचालकांना आपली वाहने रस्त्याकडेला थांबवून आसरा शोधावा लागला.
या पावसामुळे नेहमीप्रमाणे स्मार्ट सिटीची विकास कामे सुरू असलेल्या ठिकाणी तसेच अर्धवट अवस्थेतील विकास कामांच्या ठिकाणी चिखलमय वातावरण निर्माण झाले होते. गेल्या कांही दिवसांपासून उष्म्यात वाढ झाली होती. मात्र आज पडलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला.