महापालिकेच्या शववाहिकांच्या दूरावस्थेसंदर्भात बेळगाव लाईव्हने उठलेल्या आवाजाची दखल घेत पालिका प्रशासनाकडून युद्धपातळीवर शववाहिकाचे नूतनीकरण करून त्यांचा अंतर्गत कायापालट करण्यात आला आहे.

बेळगाव महानगरपालिकेच्या शववाहिकांच्या अंतर्गत भागाची दुर्दशा झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. सदर शववाहिकांसंदर्भात जागरूक सामाजिक कार्यकर्ते मदन बामणे यांनी आवाज उठविताना बेळगाव लाईव्हला माहिती दिली.
तेंव्हा ‘शववाहिकाच व्हेंटीलेटरवर…’ या शीर्षकाखाली बेळगाव लाईव्हने सर्वप्रथम गेल्या 12 मे रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. सदर वृत्तात लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे महत्वाकांशी स्मार्ट सिटी योजनेत असलेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या शववाहिकांचा आतील बाजूने पूर्णपणे खराब झालेला मागील दरवाजा, डळमळीत आसनव्यवस्था, तसेच मृतदेहासाठी असणाऱ्या स्ट्रेचरचे कुशन फाटून झालेल्या लक्तरांची सचित्र माहिती देण्यात आली होती.
या वृत्ताची गांभीर्याने दखल घेत महापालिका प्रशासनाकडून जनतेच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सर्व शववाहिकांचे युद्धपातळीवर नूतनीकरण करण्यात आले आहे. आता शववाहिकेत नवे स्ट्रेचर उपलब्ध करून देण्याबरोबरच अंतर्गत भागाचे नूतनीकरण करण्यात आले आहे.
मृतदेहानजीक नातलगांना बसण्यासाठी असलेले पूर्वेचे खराब झालेले बाकडे बदलून त्या ठिकाणी चांगल्या कुशनची आसन व्यवस्था करण्यात आली आहे. शववाहिकेतील सदर सुधारणेमुळे नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.