Saturday, April 27, 2024

/

‘गुरुवंदना’ कार्यक्रमाचे नेमके फलित काय?

 belgaum

सकल मराठा समाजातर्फे नुकत्याच आयोजित केलेल्या गुरुवंदना कार्यक्रमाचे फलित काय? याचा जर विचार केल्यास या कार्यक्रमाचा दूरगामी परिणाम फक्त बेळगावातच नव्हे तर कर्नाटकाच्या राजकारणावर घडणार आहे. कारण मराठा समाजाचे जगद्गुरु वेदांतचार्य परमपूज्य श्री मंजुनाथ भारती स्वामीजी यांना कर्नाटक प्रदेशातील सीमाभागासह तब्बल 80 लाख मराठा समाज बांधवांचे पाठबळ लाभले आहे.

सकल मराठा बेळगावतर्फे गेल्या रविवारी आयोजित परमपूज्य श्री मंजुनाथ भारती स्वामीजी यांच्या गुरुवंदना कार्यक्रमाचे यश म्हणजे बेळगावसह जिल्ह्यातील मराठा समाज बांधव यानिमित्ताने मोठ्या प्रमाणात संघटित झाला.

ही एकजूट सध्या सोशल मीडियावर गुरुवंदना कार्यक्रमासंदर्भात प्रसिद्ध केले जाणारे फोटो आणि मजकुरावरून स्पष्ट होतो . सकल मराठा समाजाच्या गुरुवंदनेनिमित्त मराठा समाजातील प्रत्येक घटक आज संघटित झाला आहे, परिणामी परमपूज्य श्री मंजुनाथ भारती स्वामीजी यांच्या गुरुवंदना कार्यक्रमास एक सामाजिक अदीष्ठान लाभले आहे.

 belgaum

मोठ्या संख्येने उपस्थित मराठा समाज बांधवांमुळे भव्य प्रमाणात साजरा झालेल्या सकल मराठा समाजाच्या बेळगावातील गुरुवंदना कार्यक्रमाचा दूरगामी परिणाम कर्नाटकच्या राजकारणावर होणार हे निश्चित असल्याचे जाणकारांचे मत आहे. कारण या गुरुवंदना कार्यक्रमामुळे परमपूज्य श्री मंजुनाथ भारती स्वामीजी यांना शंभर हत्तींचे बळ लाभले आहे. कर्नाटकात मराठा समाज विस्कळीत आहे. तो संघटित करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू झाले आहेत, त्याचाच एक भाग म्हणून बेळगावात गुरुवंदना कार्यक्रम पार पडला आणि या कार्यक्रमाच्या अभूतपूर्व यशामुळे परमपूज्य श्री मंजुनाथ भारती स्वामीजी यांनी स्वतःची अशी वेगळी ताकद निर्माण केली आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. स्वतःच्या धर्मपिठाच्या माध्यमातून वेळोवेळी सरकारवर दबाव टाकून इतर समाज आपले इप्सित साध्य करत असतात, हे लक्षात घेऊन बेंगलोर येथील गोसाई मठाचे मठाधिपती म्हणून पट्टाभिषेक झाल्यानंतर परमपूज्य श्री मंजुनाथ भारती स्वामीजी यांचे राज्यभरात कार्यक्रम होत आहेत. या माध्यमातून स्वामीजींनी आपल्या मराठा समाजाला संघटित करण्यास सुरुवात केली आहे.Sakal maratha rally

बेळगावच्या सकल मराठा समाजाने गुरु वंदना कार्यक्रम मोठ्या प्रमाणात यशस्वी करून आपल्या मनगटातील ताकद वाढविली आहे. या पद्धतीने सकल मराठा समाज आता राज्यातील एक शक्ती स्थान बनू लागला आहे. आणि याचा दुरगामी परिणाम कर्नाटकच्या भविष्यातील राजकारणावर दिसून येणार आहे. सरकार दरबारी मराठी समाजाचा रेटा अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुरुवंदना कार्यक्रमाच्या निमित्ताने मराठा समाजातील तळागाळातील बांधवांसह उद्योगपती, डॉक्टर, वकील, इंजिनीयर सर्वजण रस्त्यावर उतरले, संघटित झाले.

एकंदर मराठा समाजाचे उज्ज्वल भवितव्य अधोरेखित करणारी ही घटना म्हणजे बेळगावातील सकल मराठा समाजाचा गुरुवंदना कार्यक्रम होय. थोडक्यात परमपूज्य श्री मंजुनाथ भारती स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज राज्यातील राजकारणासह सर्व क्षेत्रातील प्रमुख प्रवाहात येण्यासाठी सज्ज झाला आहे. याची दखल जर कर्नाटकातील मातब्बर राजकारण्यांनी घेतली नाही तर त्यासारखे दुर्दैव नाही असे म्हणावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.