बेळगावच्या केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डाॅ. प्रभाकर कोरे यांना न्यूयॉर्क येथे शनिवारी झालेल्या दिमाखदार कार्यक्रमात अमेरिकेतील प्रतिष्ठित इंडो-अमेरिकन प्रेस क्लबने ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित केले आहे.
उत्तर कर्नाटक व महाराष्ट्रात विशेष करून ग्रामीण भागात सामान्य लोकांना दर्जेदार शिक्षण आणि किफायतशीर आरोग्य सुविधा देत समाज आणि राष्ट्र निर्माण कार्यात देत असलेल्या योगदानाची दखल घेऊन डाॅ. प्रभाकर कोरे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
न्यूयॉर्क येथील भारतीय दूतावासात प्रेस क्लब ऑफ युएसए यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमांमध्ये तेथील कॉन्सुलेट जनरल रणधीर जयस्वाल यांनी डाॅ. कोरे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला.
याप्रसंगी न्यूयॉर्कचे माजी महापौर बिल दे ब्लासिओ, भारतीय उद्योजक व न्यूयॉर्क शहर आर्थिक विकास मंडळाचे सदस्य प्याम क्वात्रा, झेविअर विद्यापीठाचे अध्यक्ष रविशंकर भोपळापूर, प्रसिद्ध कर्करोग तज्ञ पद्मश्री डॉ. दत्तात्रय नोरी, इंडो -अमेरिकन प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष कमलेश मेहता आदी मान्यवर मंडळी हजर होती. सदर कार्यक्रमात बोलताना बेळगाव जिल्ह्यातील अंकली गावातून आपला सुरू झालेला प्रवास ते शेकडो संस्था यांची यशोगाथा डाॅ. प्रभाकर कोरे यांनी सांगितली.
तसेच आपल्याला आयुष्यात अनेकांचे सहकार्य लाभल्याचे स्पष्ट केले. डॉ प्रभाकर कोरे हे ग्रामीण भागापासून राजधानी दिल्ली ते परदेशातही शिक्षण संस्था सुरू करून लाखो मुलांना विद्यादानाचे कार्य करत आहेत त्यांच पद्धतीने आरोग्य क्षेत्रातही ते मोठी सेवा देत आहेत.