यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सायकली देण्यात येतील अशी घोषणा मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली आहे.
तुमकुर येथे एका शाळेच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शाळांमधून चांगले शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले जातील. विद्यार्थ्यांना सायकलींबरोबरच गणवेश व पाठ्यपुस्तकांचे देखील वेळेत वितरण करण्याची ग्वाही देताना शालेय विद्यार्थ्यांना जिल्हा दर्शन आणि कर्नाटक दर्शनाचीही सोय केली जाईल, असे मुख्यमंत्री बोम्मई यांनी स्पष्ट केले.
शालेय विद्यार्थिनींना ‘क्लिनिंग पॅड’ दिले जातील. एसडीएमसी मार्फत सरकारी शाळांतून ओळखपत्रे दिली जातील. शाळांमध्ये क्रीडासाहित्य नसल्याबद्दल बोलताना क्रीडा उपकरणे खरेदी करण्यासाठी गेल्या वर्षी 5 कोटी रुपये दिले होते. या वर्षी त्यासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद केली जाईल, असेही मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.