नव्या शैक्षणिक वर्षाला आज सोमवारपासून प्रारंभ झाला असला तरी विद्यार्थ्यांमध्ये बसपास बाबत असलेला संभ्रम दूर करताना वायव्य कर्नाटक परिवहन मंडळाने येत्या 30 जूनपर्यंत विद्यार्थ्यांचे जुने बसपास सर्व बसेसमध्ये चालणार असल्याचा खुलासा केला आहे. त्याचप्रमाणे नवीन बसपास वितरणाची तारीख लवकरच जाहीर केली जाईल असे स्पष्ट केले आहे.
दरवर्षी 1 जूनपासून प्राथमिक आणि माध्यमिक शाळांसाठी बसपास वितरण प्रक्रिया सुरू होते. तथापि यंदा शासनाने 16 मेपासून शैक्षणिक वर्षाला प्रारंभ केला आहे. परिवहन मंडळाने मात्र अद्याप बसपास वितरणाचे कोणतेच नवे वेळापत्रक जाहीर केलेले नसल्यामुळे विद्यार्थ्यांसमोर बसपासचा पेच निर्माण झाला होता.
त्यामुळे परिवहन मंडळाने विद्यार्थ्यांमध्ये असलेली ही साशंकता दूर करताना मागील 2021 -22 सालासाठी वितरित करण्यात आलेले बसपास जून अखेरपर्यंत चालणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या बसपासचा वापर करून विद्यार्थ्यांना शाळेला ये-जा करता येणार आहे. नूतन बसपास वितरणाची तारीख अद्याप निश्चित झालेली नसली तरी ती तारीख देखील लवकरच जाहीर केले जाणार आहे. यंदाही विद्यार्थ्यांना सेवा सिंधू पोर्टलद्वारे ऑनलाईन बसपास अर्ज दाखल करावा लागणार आहे.
दरम्यान, बेळगाव परिवहन विभागाचे डीटीओ के. के. लमानी यांनी नूतन बस पास वितरणाची तारीख हुबळी येथील मुख्य कार्यालयाकडून जाहीर केले जाणार असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना मागील शैक्षणिक वर्षासाठी देण्यात आलेल्या बसपाची मुदत 30 जूनपर्यंत आहे. त्याचा वापर करून परिवहन मंडळाच्या बसमधून विद्यार्थी प्रवास करू शकतात, असे स्पष्ट केले आहे.