वेड्या बहिणीची वेडी ही माया असे म्हटले जाते .आपल्या भावासाठी वाट पाहत बसणारी बहीण आणि तिच्या मदतीसाठी धावून जाणारा भाऊ अशी उदाहरणे अनेक ठिकाणी पाहायला मिळतात.
असेच एक ताजे उदाहरण खानापूर शहरात पाहायला मिळाले. मानसिक दृष्ट्या अत्यवस्थ झालेल्या एका बहिणीला मदत करण्यासाठी बेळगावातून भाऊ धावून गेला आणि त्याने तिला तिच्या घरी पाठवण्यास मदत केली.
ईतरांशी साधे बोलण्यासही नकार देणार्या त्या बहिणीने आपल्या भावाचे मात्र ऐकले. हा भाऊ म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून बेळगावचे माजी महापौर आणि सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे आहेत. खानापूर शहरामध्ये एक वेडसर महीला फिरत असल्याचा दूरध्वनी खानापुर पोलीस स्थानकात आला. यावेळी त्या महिलेशी बातचीत करून तिची विचारपूस करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला.
तर तिने त्यांना योग्य प्रतिसाद दिला नाही .यामुळे अखेर पोलिसांनी विजय मोरे यांना फोन करून आपली मदत हवी आहे, आपण कृपया खानापूरला यावे अशी विनंती केली. कितीही वेडसर व्यक्ती असो विजय मोरे ना पाहिले कि तो आपली भावना व्यक्त करतो, असा अनुभव असलेल्या पोलीस निरीक्षक शिंगे यांनी विजय मोरे यांना येण्याची विनंती करताच मोरे तातडीने तेथे गेले. त्यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र आलन मोरे त्यांचे मित्र आर्यन नलवडे आणि विजय मोरे यांची कन्या शरल ही सारी मंडळी होती .
खानापूर शहरात फिरणार्या त्या महिलेचा शोध घेऊन तिची विचारपूस करण्यात आली. यावेळी त्या महिलेचा पती सरकारी नोकरीत असून तिची योग्य काळजी घेण्यात न आल्यामुळे ही अवस्था होऊन बसल्याचे दुःख तिने सांगितले. यावेळी संबंधित पतीशी संपर्क साधून या महिलेची काळजी न घेतल्यास कारवाई करण्यात येईल. अशी तंबी देण्यात आली .माजी महापौर विजय मोरे यांचा फोन येताच त्या सरकारी नोकरीत असलेला पतीने तातडीने खानापुरात दाखल होऊन संबंधितांची माफी मागितली आणि त्या महिलेला घेऊन आपल्या घरी गेला .
विजय मोरे यांचा हस्तक्षेप झाला नसता तर कदाचित अनेक दिवस ती महिला खानापूर येथे असुरक्षितरित्या फिरत राहिली असती, त्यामुळे पोलीस निरीक्षक आणि इतर पोलिसांनी त्यांचे आभार मानले. या कार्यात खानापूर येथील गजानन घाडी यांनीही मोलाची मदत केली असल्याची माहिती विजय मोरे यांनी दिली आहे.