बेळगाव शहर आणि परिसरात आज मंगळवारी दुपारी पुन्हा विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह वळीव पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जनजीवन कांही काळ विस्कळीत झाले.
बेळगाव शहरासह शहापूर, वडगाव, टिळकवाडी, जुने बेळगाव, खासबाग व ग्रामीण भागात आज दुपारी वळीव पावसाने लावलेल्या हजेरीमुळे कांही काळ जनजीवन विस्कळीत झाले. विजेच्या कडकडाटासह पावसाचे आगमन झाल्याने बाजारपेठेतील फेरीवाले, बैठे व्यापारी यांच्यासह छत्री अथवा रेनकोट नसलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. कालपासून अचानक हजेरी लावणाऱ्या वळीव पावसामुळे शहराच्या सखल भागात तसेच रस्त्यांवर पाण्याची तळी साचली आहेत.
साफसफाई अभावी कांही ठिकाणी गटारी तुंबून पाणी रस्त्यावरून वाहत होते. पावसामुळे भरधाव जाणाऱ्या दुचाकीस्वारांना आपली वाहने थांबवून निवारा शोधावा लागला. शहर उपनगर आणि ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह काल सोमवारी झालेल्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी नुकसान झाले. त्याच प्रमाणे आज देखील काही ठिकाणी झाडाच्या फांद्या तुटून पडण्याचे प्रकार घडले.
कांही दिवसांपासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे शहरातील स्मार्ट सिटीची कामे सुरू असलेल्या ठिकाणी मात्र चिखलाच्या दलदलीचे साम्राज्य पसरले आहे. येथील रस्ते चिखलाने रंगून गेल्याचे पहावयास मिळत आहेत.
पावसामुळे आज ग्रामीण भागात घराबाहेर पडलेल्यांची तारांबळ उडाली होती. शहराकडे ये-जा करणाऱ्या नागरिकांना वाहने थांबवून रस्त्या शेजारील झाडं अथवा दुकानांचा निवारा शोधावा लागला. शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांचीही एकच धावपळ उडाली. या पावसामुळे जोंधळा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे कांही पिकांना फटका बसला असला तरी ऊस व काजू पिकासह अन्य पिकांना हा अवकाळी पाऊस फायदेशीर असल्याचे जाणकारांचे मत आहे.