पुनर्निर्मित बेळगाव रेल्वे स्थानकाच्या दर्शनीय भिंतीवरील महापुरुष व क्रांतीकारांचा प्रतिमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमांचा समावेश केला जावा, या बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी केलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री साहेब पाटील दानवे यांनी संबंधित खात्याला शिवराय आणि शाहू महाराजांच्या प्रतिमा बसविण्याचा आदेश बजावला आहे.
पुनर्निर्मित बेळगाव रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी छ. शिवाजी महाराजांची प्रतिमा नसल्याने व्यक्त होणाऱ्या तीव्र संतापाची दखल घेत उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी बेळगाव रेल्वे स्थानकावर श्री छ. शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमा उभाराव्यात, अशी मागणी गेल्या 6 एप्रिल रोजी नवी दिल्ली मुक्कामी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली होती. बेळगाव रेल्वे स्थानकावर शाहू महाराज व छ. शिवाजी महाराज या दोघा महापुरुषांची प्रतिमा बसविण्याच्या मागणीचे निवेदनही सादर केले होते.
बेळगाव रेल्वे स्थानकासमोरील भिंतीवर स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, संगोळी रायण्णा, कित्तूर राणी चन्नम्मा अशा महापुरुष व क्रांतिकारकांच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत. तथापि दुर्देव आणि खेदाची बाब म्हणजे त्यामध्ये हिंदवी स्वराज्य संस्थापक छ. शिवाजी महाराजांचीच प्रतिमा नाही. या प्रकारामुळे शिवभक्तांमध्ये मोठा संताप व्यक्त होत आहे. शिवरायांच्या प्रतिमेसाठी अनेकांनी आंदोलनाचा इशाराही दिला याची माहिती आमदार बेनके यांनी मंत्र्यांना दिली होती. यासंदर्भात आमदार बेनके यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता.
त्याची दखल घेत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री साहेब पाटील दानवे यांनी नवनिर्मित बेळगाव रेल्वे स्थानकाच्या भिंतीवरील महापुरुष आणि क्रांतिकारकांच्या प्रतिमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमांचा अंतर्भाव करावा, अशी सूचना संबंधित खात्याला केली आहे.
आता रेल्वे स्थानकांत समोरील प्रतिमांमध्ये जगत ज्योती श्री बसवण्णा, क्रांतिवीर संगोळ्ळी रायान्ना आदींच्या पुतळ्यांचा अंतर्भाव व्हावा यासाठी देखील आमदार ॲड. अनिल बेनके यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. दरम्यान रेल्वे स्थानकासमोरील प्रतिमांमध्ये शिवराय आणि शाहू महाराजांच्या प्रतिमांचा अंतर्भाव होणार असल्यामुळे शिवप्रेमींमध्ये समाधान व्यक्त होत असून ते आमदार बेनके यांच्या कार्याची प्रशंसा होत आहे.