गुढी पाडव्यानिमित्त शहरातील चव्हाट गल्ली येथील श्री ज्योतिर्लिंग देवस्थान देवघरामध्ये आज सकाळपासून विविध धार्मिक विधी पार पडले. कोरोना महामारी संपावी आणि अशी वेळ पुन्हा जगावर येऊ नये यासाठी यावेळी देवाला साकडे घालण्यात आले.
चव्हाट गल्ली श्री ज्योतिर्लिंग देवस्थान येथे आज सकाळी सर्वप्रथम देवाला 51 पदार्थांच्या रसाचा रुद्राभिषेक घालण्यात आला. या पदार्थांमध्ये फळे, ड्रायफ्रूट्स, दूध दही, तूप, लोणी वगैरे वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश होता. सर्व पदार्थांच्या रसाच्या रुद्राभिषेकाने पाडव्यानिमित्त आज हिंदू नववर्षाचा शुभारंभ करण्यात आला. नव्या युगातील युवा पिढीला धार्मिक विधीत स्वारस्य नसल्याचे म्हंटले जाते. परंतु चव्हाट गल्लीतील युवकांनी आज पुढाकार घेऊन ज्योतिर्लिंग देवस्थानातील धार्मिक विधी पार पाडण्याकरिता विशेष परिश्रम घेतले.
आज पाडव्यानिमित्त देवाला आंब्याची आरस करण्यात आली होती. त्याच प्रमाणे दागिने व नवीन वस्त्र आणि आंब्याची आरास याद्वारे देवाची आज एक राजाच्या थाटात वेशभूषा करून आज गादीवर बसवण्यात आले होते. देवघराच्या वारसदार शांताबाई इराप्पा धुराजी यांच्या मार्गदर्शनाखाली हा धार्मिक उपक्रम राबविण्यात आला. देवघराचे पुजारी लक्ष्मण पिराजी किल्लेकर यांच्या आणि युवकांच्या हस्ते अभिषेकाचा कार्यक्रम संपन्न झाला.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने हा अभिषेक झाल्यानंतर गुढीपाडव्याला विशेष महत्त्व म्हणजे वर्षभर घरात असलेली देवाची सासन काठी आज बाहेर काढली जाते आणि विधिवत पुजवली जाते. ती पुन्हा आज संध्याकाळी किंवा उद्या संध्याकाळी पुन्हा घरात घेतली जात नाही. ही सासनकाठी 7 तारखेला चैत्र पौर्णिमा ज्योतिर्लिंग यात्रा करून आल्यानंतर घरात घेतली जाते. सर्व सासनकाठ्या या पद्धतीने पाडव्याला उभ्या केल्या जातात. तीच परंपरा चव्हाट गल्ली येथे देखील आहे.
आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे चव्हाट गल्लीतील भाविक होळी सण झाल्या झाल्या सर्वप्रथम वारीची सुरुवात बसवन कुडची यात्रेच्या इंगळ्याना उपस्थिती दर्शवून परततात. या पद्धतीने होळीनंतर विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होते. चव्हाट गल्लीच्या युवापिढीने गुढीपाडव्यानिमित्त श्री ज्योतिर्लिंग देवघरातील पूजाविधीची प्रथा आज देखील तशीच जिवंत ठेवली आहे.
यामुळेच देवाचा चव्हाट गल्लीसह समस्त बेळगावकरांना आशीर्वाद आहे आणि म्हणूनच कोरोना महामारीच्या संकटात जगाच्या तुलनेत बेळगाववासिय फारसे पोळले गेले नाहीत, असे मानले जाते. आज पाडव्याच्या निमित्ताने जो अभिषेक घालताना ही महामारी संपून जावी आणि जगावर अशी वेळ कधीच येऊ नये, असे साकडे देवाला घालण्यात आले.