नवी दिल्लीसह उत्तर भारतातील इतर राज्यांमध्ये नव्याने आढळून येणाऱ्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कोरोना महामारीची ताजी परिस्थिती जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज सोमवारी उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली.
उच्चस्तरीय बैठकीमध्ये कांही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून प्रामुख्याने सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी फेस मास्क वापरणे अनिवार्य असणार आहे. नागरिकांनी विनाकारण गर्दी करणे टाळावे आणि सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करावे, असे राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
कोरोनाच्या संभाव्य चौथ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन राज्यात सार्वजनिक ठिकाणी आणि बंदिस्त सभागृहातील कार्यक्रमाप्रसंगी फेसमास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. तसा आदेश काढण्यात येणार आहे. तथापि या नियमाचे उल्लंघन केल्यास सध्यातरी कोणताही दंड आकारला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या चौथ्या लाटेपासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी कोरोना मार्गदर्शक सूचीचे पालन करून फेसमास्कचा वापर करावा, असे आवाहनही मंत्री डाॅ. सुधाकर यांनी केले.
त्याचप्रमाणे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीच्या दुसऱ्या डोसासह बूस्टर डोस देखील घ्यावा. राज्यातील 5 वर्षावरील मुलांच्या लसीकरणाला देखील लवकरच प्रारंभ होईल, अशी माहितीही आरोग्य मंत्र्यांनी दिली.