धामणे ग्रामपंचायतीची इमारत स्मशानभूमीत न बांधता मोडकळीस आलेली जुनी इमारत काढून त्या ठिकाणीच नवी इमारत बांधण्यात यावी, अशी जोरदार मागणी समस्त धामणे ग्रामस्थांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
धामणे (ता. जि. बेळगाव) येथील ग्रामस्थांच्यावतीने माजी ग्रा. पं. सदस्य विजय बाळेकुंद्री, नितीन पाटील व शिवप्रतिष्ठान धामणे विभाग प्रमुख महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी निवेदनाचा स्वीकार करून यासंदर्भात लागलीच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सांगून चौकशी केली जाईल आणि स्मशानभूमीतील काम बंद केले जाईल, असे आश्वासन दिले. निवेदन सादर करतेवेळी माजी ग्रा. पं. उपाध्यक्ष यल्लाप्पा रेमानाचे, दशरथ येळ्ळूरकर, परसू चौगुले, केदारी बाळेकुंद्री संभाजी पाटील, दत्ता होणुले आदी गावकरी उपस्थित होते.
धामणे ग्रामपंचायतीने गावात हुकूमशाही चालवली असून नागरिकांचा विरोध डावलून गावच्या स्मशानभूमीतील सर्व्हे क्र. 515 या जागेवर कोर्टाची केव्हीट घेऊन नवीन इमारत बांधण्याचा घाट रचला जात आहे. ग्रामपंचायतीची मूळ इमारत मोडकळीस आल्याने हा उपद्व्याप केला जात असल्याचा आरोप आहे. संपूर्ण गावचा विरोध असतानाही गेल्या 4 एप्रिल रोजी स्मशानाच्या जागेतच ग्रामस्थांना सुगावा न लागता फक्त ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत नियोजित ग्रामपंचायत इमारतीचा भूमिपूजन समारंभ करण्यात आला.
यासंदर्भात जाब विचारण्यासाठी आज मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु ग्रामपंचायतीने सर्व्हे क्र. 515 या जागेवर न्यायालयात केव्हीट ग्रामपंचायत पीडीओंच्या नावाने घातले असल्यामुळे पोलिसांनाही मोर्चाला परवानगी नाकारली. परिणामी त्याऐवजी आज सोमवारी ग्रामस्थांनी पीडिओ आणि ग्रामपंचायत अध्यक्षांसह जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ व जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
धामणे ग्रामपंचायत इमारत स्मशानभूमीच्या जागेत बांधण्यास परवानगी दिली जाऊ नये. त्याऐवजी मोडकळीस आलेली जुनी इमारत काढून त्याच ठिकाणी नवीन इमारत बांधावी. जुन्या ठिकाणीच नवी ग्रामपंचायत इमारत असणे हे सर्व नागरिकांच्या दृष्टीने सोईचे आहे, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.