Friday, April 26, 2024

/

कंत्राटदार आत्महत्या प्रकरणाला नवा ट्विस्ट!

 belgaum

मंत्री ईश्वरप्पा यांचा राजीनामा द्यावा लागलेल्या कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरणाने आता नवा ट्विस्ट घेतला असून हिंडलगा ग्रामपंचायतीचे अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांनी मयत पाटील याच्या घराची ‘जनरल पॉवर ऑफ ॲटर्नी’ घेतली होती, अशी धक्कादायक माहिती तपासात उघडकीस आली आहे.

मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांचा राजकीय बळी घेतलेल्या कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरणात रोज नवनवे धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी बेळगावात दाखल झालेल्या उडुपी पोलिसांच्या पथकाने आज पाचव्या दिवशी आपला तपास सुरूच ठेवला आहे.

मृत संतोष पाटील याच्या घराची जनरल पॉवर ऑफ ॲटर्नी हिंडलगा ग्रामपंचायतीचे अध्यक्ष नागेश मन्नोळकर आणि ग्रा. पं. सदस्य उद्योजक एन. एस. पाटील यांनी घेतली होती ती का घेतली होती? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरणी उडपी पोलीसांनी हिंडलगा ग्रा. पं.च्या पीडीओ वसंतकुमारी आणि माजी पीडीओ गंगाधर नाईक यांची गेल्या तीन दिवसांपासून कसून चौकशी चालवली आहे. हिंडलगा ग्रामपंचायत हद्दीत करण्यात आलेल्या 4 कोटी रुपये खर्चाच्या एकूण 108 विकास कामांची चौकशी तपास पथकाकडून करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने मयत संतोष पाटील यांनी उपकंत्राट दिलेल्या 12 कंत्राटदारांची देखील उडपी पोलिसांनी चौकशी करून बरीच कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.

 belgaum

खळबळजनक बाब ही म्हणजे हिंडलगा ग्रा. पं. अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांनी संतोष पाटील यांच्या घराचे वटमुखत्यारपत्र घेतल्याचे समजते. यामुळे या आत्महत्या प्रकरणाला नवा ट्विस्ट मिळाला आहे. मन्नोळकर आणि ग्रा. पं. सदस्य पाटील या दोघांनी मिळून संतोष पाटील यांच्या घराचे वटमुखत्यारपत्र घेतल्याची माहिती उडुपी पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे. यासंदर्भात ग्रा. पं. अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांनी संतोष पाटील यांच्या घराचे वटमुखत्यारपत्र घेतल्याची कबुली पोलीस चौकशीत देताना तो सर्वस्वी वेगळा व्यवहार असल्याचे सांगितले आहे. ग्रामपंचायत हद्दीतील 108 विकास कामे आणि आत्महत्येचा या वटमुखत्यारपत्राशी कांहीही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी काल संतोष पाटील यांच्या कुटुंबीयांची बडस येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यावेळी त्यांनी संतोषी यांच्या आईचे सांत्वन करून धीर दिला. ते म्हणाले की, आम्हाला वेगळीच माहिती मिळाली आहे. संतोष यांना सबरजिस्ट्रार कार्यालयात घेऊन जाऊन जनरल पॉवर ऑफ ॲटर्नी नोंद करण्यात आली होती. कोणत्या प्रॉपर्टीची जीपीए घेण्यात आली याचे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत. सरकार काय कारवाई करणार ते करू दे. तुम्ही धीराने रहा, तुमच्या घरातील मुले शिकलेली आहेत. ती कुणापुढे वाकणार नाहीत. संतोष यांनी केलेल्या 108 विकास कामांचे पुरावे कागदपत्रे फोटो आमच्याकडे आहेत, असे शिवकुमार यांनी सांगितले.

हिंडलगा यात्रेपूर्वी लाॅक डाऊन होता मात्र त्यानंतर एक महिन्याच्या आत कामे पूर्ण केली पाहिजेत असे सांगण्यात आले होते. त्यानुसार एका महिन्यात सर्व कामे पूर्ण करेन असे माझा मुलगा संतोषाने सांगितले होते. सरकारने बिले दिली असती तर माझ्या मुलाचा जीव वाचला असता असे संतोषच्या आई पार्वती यांनी डोळ्यात पाणी आणून सांगितले. त्यावर पार्वती यांचे डी. के. शिवकुमार यांनी सांत्वन केले. अधिकारी आम्ही कुठलेही काम कंत्राट दिलेले नाही असे सांगत आहेत. परंतु तुमच्या घरी भेट दिलेल्या मंत्री मुरुगेश निराणी यांनी संतोषने केलेल्या कामाचे बिल द्यायला लावू असे म्हंटले आहे. जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी देखील संतोषने विकास कामे केल्याचे कबूल केले आहे. एवढेच काय तुमच्या जिल्ह्यातील एका माजी मंत्र्यानेही संतोषने कामे केल्याचे सांगितले आहे. या सगळ्यांवर आम्ही विचार करत आहोत. तुम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून देऊ असे आश्वासन डी. के. शिवकुमार यांनी मयत कंत्राटदार संतोष पाटील यांच्या आईला दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.