Sunday, December 22, 2024

/

श्री यल्लमा यात्रेसाठी अतिरिक्त 50 बसेस

 belgaum

दवणा यात्रेनिमित्त सौंदत्ती श्री रेणुका देवी दर्शनासाठी डोंगरावर भाविकांची गर्दी वाढणार असल्यामुळे वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाने भाविकांच्या सोयीसाठी अतिरिक्त 50 बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचप्रमाणे सामुहिक बस आरक्षणाची सोय देखील करण्यात आली आहे.

सौंदत्ती डोंगरावरील श्री यल्लमा देवीच्या दवणा यात्रेनिमित्त परिवहन महामंडळाने 50 बसेस राखीव ठेवल्या आहेत. संपूर्ण महिना डोंगरावर भाविकांची दर्शनासाठी गर्दी राहणार असल्याने मंडळाकडून ही अतिरिक्त बस सेवा सुरू ठेवली जाईल.

यासह सामूहिक भाडेतत्त्वावर बस आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सध्या मागणीनुसार गावोगावी जाऊन भाविकांना सौंदत्तीकडे ने -आण केली जात आहे. मध्यवर्ती बस स्थानकावर सौंदतीकडे जाणाऱ्या बस थांबण्यासाठी विशेष पिकअप पॉइंट सुरू करण्यात आले आहेत.

वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाकडून दरवर्षी यात्रा नवरात्र आणि देवीच्या उत्सव काळात विशेष पिकअप पॉइंट सुरू करून प्रवाशांसाठी बेळगाव ते सौंदत्ती थेट विनाथांबा बससेवा सुरू केली जाते. कोरोना संसर्गामुळे मागील दोन वर्षे ही सेवा खंडित होती. गतवर्षी नवरात्रीत मंदिर खुले झाल्याने परिवहन सेवा सुरू होती.

त्यानंतर पुन्हा मंदिर बंद ठेवण्यात आले होते. देवीचे मंदिर गेल्या 1 फेब्रुवारीपासून भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. त्यातच हा यात्रा काळ असल्यामुळे डोंगरावर भाविकांची गर्दी होत आहे. त्यासाठी परिवहन मंडळाकडून अतिरिक्त बस सेवा सुरू करण्यात आली आहे. चंदगड आणि कोवाड भागातूनही कर्नाटक परिवहन मंडळाच्या बसेस आरक्षित केला जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.