शहरातील विश्वेश्वरय्यानगर तेथील संपगी मार्गाशेजारील जागेमध्ये पत्रकार भवनाची उभारणी करण्यात येणार असून भवनाच्या इमारतीचा भूमिपूजन समारंभ येत्या 2 मे रोजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी दिली.
कर्नाटक राज्य श्रमिक पत्रकार संघाच्या बेळगाव जिल्हा शाखेतर्फे विश्वेश्वरय्यानगर येथील संबंधित जागेमध्ये पत्रकार भवनाचा नामफलक उभारण्याचा कार्यक्रम आज शनिवारी सकाळी पार पडला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बेळगावच्या खासदार मंगला अंगडी, उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके आणि दक्षिणचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते पत्रकार भवनाच्या नामफलकाचे पूजन करून तो उभारण्यात आला. राज्यात बेळगाव जिल्हा सर्वात मोठा जिल्हा आहे. मात्र येथील पत्रकारांसाठी पत्रकार भवन नाही. गेल्या अनेक वर्षांपासून अनेक कारणास्तव ते काम झालेले नाही. मात्र आता प्रतीक्षा संपली असून पत्रकार भवनासाठी योग्य जागा मिळाली आहे. सदर जागेत लवकरच देशात आदर्श ठरावे असे पत्रकार भवन उभारले जाईल. यासाठी आवश्यक सर्व तयारी करण्यात आली आहे. आमदार निधीतून 10 लाख रुपयांचा निधी उपलब्ध केला असून कमी पडल्यास आणखी निधी उपलब्ध करेन, असे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी सांगितले.
खासदार मंगला अंगडी यांनी यावेळी बोलताना पत्रकार भवनाची जागा ही आमच्या घराशेजारीच आहे. त्यामुळे भवनाची निर्मिती उत्तम होईल याकडे माझे लक्ष राहणार आहे असे सांगून या भवनासाठी आपल्या निधीतूनही भरीव मदत केली जाईल, असे स्पष्ट केले. श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप कुरुंदवाडे यांनीही आपले विचार व्यक्त केले. व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार राजशेखर पाटील आणि महापालिकेचे आरोग्य अधिकारी संजय डुमगोळ उपस्थित होते.
याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार मंजुनाथ पाटील यांनी पत्रकार भवनासाठी वैयक्तिक 51 हजाराची देणगी जाहीर केली. कार्यक्रमास पत्रकार श्रीधर कोटारगस्ती, महांतेश कुरबेट, राजू भोसले, कुंतीनाथ कल्मनी, अरुण पाटील, रवींद्र उप्पार, नागराज तुप्पद, एकनाथ अगसिमनी आदी पत्रकार उपस्थित होते. महबूब मकानदार यांनी प्रास्ताविक आणि सहदेव माने यांनी स्वागत केले. श्रीकांत कुबकड्डी यांनी सर्वांचे आभार मानले.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते येत्या 2 मे रोजी पत्रकार भवनाचे भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर वर्षभरात पत्रकार भवनाची इमारत उभारण्यात येईल. या पत्रकार भवनासाठी जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार आणि विधान परिषद सदस्यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. सुमारे 3 कोटी रुपये खर्च करून हे सुसज्ज भवन उभारण्यात येईल, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. या पत्रकार भवनामध्ये 300 आसन क्षमतेचे सभागृह, वेटिंग रूम, पत्रकार परिषदेसाठी जागा, वाचन कक्ष, डिजिटल लायब्ररी, पत्रकारांना बातम्या लिहिणे अथवा टाईप करण्यासाठी व्यवस्था, हाय स्पीड इंटरनेट, टीव्ही प्रसारमाध्यमांच्या पत्रकारांसाठी 3 स्टुडिओ, फिटनेस क्लब आदी विविध सुविधा उपलब्ध असणार आहेत.