अंकोल्याचे खाण उद्योजक आणि भाजप नेते आर. एन. नायक यांच्या हत्येप्रकरणी बेळगाव प्रथम जिल्हा आणि सत्र न्यायालयासह विशेष न्यायालयाने कुविख्यात गुन्हेगार व अंडरवर्ल्ड डॉन बनंजे राजा आणि त्याच्या 9 साथीदारांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तिघा आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.
अंकोल्याचे उद्योजक आणि भाजप नेते आर. एन. नायक यांचे 3 कोटी रुपयांची सुपारी देऊन गेल्या 21 डिसेंबर 2013 रोजी हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी 7 वर्षानंतर बनंजे राजा आणि त्याचे साथीदार दोषी आढळून आले आहेत. या हत्या प्रकरणाच्या सात वर्षे चाललेल्या सुनावणीत 210 साक्षीदार तपासण्यात आले,
130 कागदपत्रे पुरावे सादर करण्यात आले आणि सुमारे 1000 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. अखेर कर्नाटक संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (कोका) बेळगाव जिल्हा विशेष न्यायालयाने कुख्यात गुन्हेगार राजेंद्र शेट्टी उर्फ बनंजे राजा आणि त्याच्या 9 साथीदारांना कारवार जिल्ह्यातील अकोल्याचे खाण उद्योजक व भाजप नेते आर्यन नायक यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवले. या प्रकरणात तिघा आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.
मुख्य जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तसेच विशेष न्यायालयाचे न्यायाधीश सी. एम. जोशी यांनी आरोपींना ही शिक्षा सुनावली. खाण उद्योजक आर. एन. नायक हत्या प्रकरणाच्या 7 वर्षे चाललेल्या सुनावणीत 210 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये प्रताप रेड्डी, अलोक कुमार, भास्कर राव आणि अण्णामलाई यांच्या सारख्या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचाही समावेश होता. न्यायालयामध्ये 2013 साली आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बनंजे राजा याच्यावर खंडणी, बलात्कार आणि खून यासारखे सुमारे 44 गुन्हे दाखल आहेत.
भाड्याच्या शार्प शूटरव्दारे नायक यांचा खून केल्यानंतर राजाने भारतातून पलायन केले होते. त्यानंतर 2015 साली त्याला माॅरक्कोतील कसाब्लांका येथे अटक करण्यात आली, तेथे त्याने प्रत्यार्पण केले. कर्नाटकात कोका कायद्यांतर्गत दाखल करण्यात आलेला हा पहिला खटला असल्याचे पोलिसांनी सांगितले. या खटल्यात सरकारच्यावतीने स्पेशल पब्लिक प्राॅसिक्युटर के. जी. पुराणिकमठ आणि श्रीनिवास अल्वा यांनी काम पाहिले. खटल्याच्या सुनावणी प्रसंगी न्यायालय परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.