Thursday, April 25, 2024

/

… पळा सुरक्षित स्थळी लपा… : ‘या’ मुलींचा युक्रेनमधील अनुभव

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष/- युद्धामुळे मेस बंद झाली. दुकाने वगैरे बंद होऊन सर्व जनजीवन ठप्प झाले. सायरन वाजला की पळा आणि सुरक्षित स्थळी जाऊन लपा नंतर कॉल करा. आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ, असे सांगण्यात येत होते. परिस्थिती इतकी भयानक होती की रात्रीची झोप उडाली होती. हे वर्णन केले आहे ऐश्वर्या जगन्नाथ पाटील या वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थिनीने, जी नुकतीच युक्रेनहून सुरक्षित आपल्या गावी येळ्ळूरला परतली आहे.

युक्रेनमधील खारकिव शहरांमध्ये रशियाने केलेल्या हल्ल्यात कर्नाटकातील राणीबेन्नूर तालुक्यातील (जि. हावेरी) चेळगिरी गावच्या नवीन ज्ञानगौडर शेखरप्पा (वय 21) या वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. त्यामुळे युक्रेनमध्ये अद्यापही अडकून पडलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर युक्रेन येथील युद्धजन्य परिस्थितीतून नुकतीच सुरक्षितपणे भारतात बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर येथे परतलेल्या ऐश्वर्या पाटील हिची बेळगाव लाईव्हने भेट घेतली असता तिने वरील प्रमाणे युक्रेनमधील आपल्या परिस्थितीचे वर्णन केले.

ऐश्वर्या जगन्नाथ पाटील ही बीएचएमएसची विद्यार्थिनी असून उच्च शिक्षणासाठी गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये ती युक्रेनला गेली होती. तेथील युद्ध परिस्थितीच्या अनुभवाबद्दल बोलताना ती म्हणाली की, आम्ही ज्यावेळी यूक्रेनला गेलो. त्यावेळी सर्व कांही सुरळीत होते. युक्रेनमध्ये जानेवारी अखेरपासून युद्धाचे सावट आले होते. तरीही आम्ही जिथे होतो त्या ठिकाणी काही धोका नव्हता. आमचे ऑनलाईन व ऑफलाइन क्लासेस सुरळीत सुरू होते. मात्र अल्पावधीत आम्हाला भारतीय दूतावासाची नोटीस आली की युद्ध सुरू झाले आहे तुम्ही आहात तेथून भारतात परत जा. तेंव्हा आम्ही तिकिटे आरक्षित केली. कांही मुले भारताकडे रवानाही झाली. मात्र दूतावासाने पुन्हा एक नोटीस जारी करताना रशियन सैन्य आधारित जात आहे. तेंव्हा घाबरण्याचे कारण नाही. तुम्ही तुमचा अभ्यासक्रम सुरू ठेवा असे आम्हाला सांगितले. त्यामुळे आम्ही आरक्षित केलेली तिकिटे रद्द केली आणि अभ्यासाला लागलो.Yellur aishwarya patil

 belgaum

अल्पावधीत दूतावासाची पुन्हा नोटीस आली आणि युद्धाला सुरुवात झाली आहे. कोणत्या परिस्थितीत कांहीही करून 28 फेब्रुवारीपूर्वी युक्रेनमधून निघा अशी सूचना आम्हाला करण्यात आली. त्यानंतर लगेच 23 फेब्रुवारी रोजी रशियाचा मोठा हल्ला झाला. युक्रेनमधील सहा विमानतळांच्या ठिकाणी हल्ला झाल्यामुळे विमानसेवा बंद झाली. परिणामी कांही मुले विमानतळावर तर कांही मुले अर्ध्या वाटेत अडकली. विविध ठिकाणी अडकून पडलेल्या मुले गोंधळून गेली होती. कारण राजधानी किवसह अन्य ठिकाणी फायरिंग आणि बॉम्ब हल्ले सुरू झाले होते. परिणामी आमची मेस बंद झाली सर्व दुकाने आणि व्यवहार बंद झाले. सायरन वाजला की सुरक्षित स्थळी जाऊन लपा. नंतर फोन करा आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ असे आम्हाला सांगण्यात आले. परिस्थिती इतकी भयानक होती की रात्रीची झोप उडाली. दुकाने वगैरे सर्व बंद असल्यामुळे आम्हा सर्वांचे पोटापाण्याचे अतिशय हाल झाले बँकांच्या एटीएममध्ये पैसेही नव्हते.

दरम्यान पुन्हा भारतीय दूतावासाकडून सांगण्यात आले की पंतप्रधान मोदी यांनी बैठक घेतली असून सर्व मुलांना सुरक्षित भारतात स्थलांतरित केले जाणार आहे. त्यानुसार चार बस गाड्यांची व्यवस्था करून आम्हाला गटागटाने रुमानिया सीमेपर्यंत पाठविण्यात आले. किवमधील नागरिक देखील रुमानियाकडे चालले असल्यामुळे सीमेपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला थोडा त्रास झाला. रुमानिया सीमेच्या अलीकडे बसमधून उतरून आम्हाला 8 कि. मी. पायी चालत रुमानिया सीमा गाठावी लागली. तेथे ट्रान्झिटव्हिजा मिळण्यासाठी पाच तास लागले. त्यानंतर आठ तासाचा प्रवास करून आम्ही रुमानिया विमानतळावर आलो. त्या ठिकाणी भारतीय दूतावासाचे अधिकारी आणि भारत सरकारचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी आमच्या जेवणखाणाची सोय केली. आम्हाला विमानात बसविले आणि आम्ही सुरक्षित भारतात पोहोचलो, अशा शब्दात ऐश्वर्या पाटील हिने आपला अनुभव सांगितला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.