सीमाभागातील मराठी पत्रकारांना देखील महाराष्ट्र शासनाने आरोग्याच्या सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी लक्षवेधी सूचना चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळात मांडली.
महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून लाभ दिला जातो. शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीची स्थापना 1 ऑगस्ट 2009 रोजी करण्यात आली.
मात्र या योजनेचा लाभ फक्त अधिकृतीधारक पत्रकारांनाच होत असून तोदेखील जुजबी आहे. गेल्या दहा-बारा वर्षात यातील आकडेवारी पाहता केवळ 258 पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. त्यांची व्याप्ती वाढवताना बेळगावच्या सीमाभागातील पत्रकारांनाही त्याचा लाभ मिळणे आवश्यक आहे.
गेल्या 63 वर्षापासून मराठी भाषा जिवंत ठेवण्याचे काम सीमाभागातील वृत्तपत्रांनी प्रामाणिकपणे केले आहे. त्यामुळे सीमाभागातील मराठी पत्रकारांना देखील आरोग्याच्या सर्व सुविधा महाराष्ट्र राज्य शासनाने उपलब्ध करून द्याव्यात असे, आमदार राजेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे.