केंद्रीय जलस्त्रोत मंत्री असताना मी देशातील तत्कालीन अर्ध्याहून अधिक आंतरराज्य पाणी तंटे निकालात काढले. परंतु कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील पाण्याच्या वादाला पूर्णविराम देण्यात मी अपयशी ठरलो, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
शहरातील जिल्हा क्रीडांगणावर आज काय पाच राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा पायाभरणी व लोकार्पण सोहळा पार पडला. याप्रसंगी मंत्री नितिन गडकरी बोलत होते. देशातील रस्त्यांचा विकास कामाबाबत माहिती देताना थोडे विषयांतर करताना केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, कर्नाटक हे प्रगत आणि समृद्ध राज्य आहे मी केंद्रीय जलस्त्रोत मंत्री असताना 1970 पासूनचे जे आंतरराज्य पाणी तंटे होते ते निकालात काढण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार संबंधित सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली येथे बोलावून घेतले. दिल्ली येथे एका बंदिस्त सभागृहांमध्ये सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. तसेच जोपर्यंत प्रत्येक पाणी तंट्यावर तोडगा निघत नाही तोपर्यंत सभागृहाचे दरवाजे उघडले जाणार नाहीत, असा इशारा सर्व मुख्यमंत्र्यांना दिला.
आमच्या त्या बैठकीमध्ये सर्वांगाने चर्चा झाली. अखेर 20 आंतरराज्य पाणी तंट्यापैकी सुमारे 13 तंटे मिटवण्यात मी यशस्वी झालो. मात्र दुर्दैवाने कर्नाटक व महाराष्ट्र यांच्यातील पाण्याचे भांडण मिटवण्यात मी अपयशी ठरलो.
कर्नाटक व महाराष्ट्रातील पाणी तंटा लवकरात लवकर मिटला पाहिजे. जलस्त्रोत मंत्री असताना मी कर्नाटकातील 5 हजार कोटी रुपयांच्या पाच प्रमुख प्रकल्पांना मंजुरी दिली होती. तसेच 1200 कोटीही दिले होते, असे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी स्पष्ट केले.