Friday, April 26, 2024

/

2024 पर्यंत बनवू अमेरिकेच्या तोडीची रस्ते : गडकरी

 belgaum

वैभव संपन्नता ही रस्त्यांमुळे येते हे ध्यानात घेतले पाहिजे. यासाठीच 2024 साल समाप्त होण्यापूर्वी हिंदुस्थानातील रस्त्यांची पायाभूत सुविधा अमेरिकेच्या तोडीची बनवण्याचे माझे ध्येय आहे. तेंव्हा भूसंपादन आदी कामे लवकरात लवकर करून दिल्यास मी वचन देतो की 2024 पर्यंत कर्नाटकातील रस्त्यांची पायाभूत सुविधा अमेरिकेच्या तोडीची असेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचे मंत्री नितिन गडकरी यांनी केले.

बेळगाव जिल्ह्यात तीन हजार 972 कोटी खर्चून उभारण्यात येणाऱ्या 238 कि.मी. लांबीच्या पाच राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा आज सकाळी पायाभरणी अर्थात शुभारंभ केल्यानंतर केंद्रीय मंत्री गडकरी बोलत होते. नेहरूनगर येथील जिल्हा क्रीडांगणावर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या सदर समारंभाप्रसंगी व्यासपीठावर केंद्रीय खाण आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री प्रल्हाद जोशी, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सी. सी. पाटील, जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ, अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री उमेश कत्ती, धर्मादाय हज आणि व खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले, खासदार मंगला अंगडी, अण्णासाहेब जोल्ले, इरांना कडाडी, रमेश जिगजिनगी, माजी खासदार प्रभाकर कोरे, आमदार ॲड. अनिल बेनके आदींसह अन्य आमदार आणि विधान परिषद सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते.

आपल्या भाषणात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रारंभी बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांना आपली बहिण मानत होते. त्या वीरराणी बळवडी मल्लंमा यांचा जयंती उत्सव आज साजरा केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी बळवडी मलम्मा यांचे संबंध पहाता मराठा आणि कन्नडीग या दोन्ही समाजातील बंधुत्व हे त्याचे प्रतिक आहे असे सांगून मल्लंमा यांना अभिवादन केले. त्याचप्रमाणे या रस्ते कामांसाठी सुरेश अंगडी माझ्याकडे सतत येत होते. मात्र आज या कामांच्या शुभारंभाप्रसंगी दुर्देवाने ते आपल्यात नाहीत. त्यांच्याही स्मृतीला मी अभिवादन करतो असे गडकरी म्हणाले. बेळगावात हाती घेण्यात येणारे राष्ट्रीय महामार्गाचे हे प्रकल्प गोल्डन कॉड्रीलॅट्रलचा एक भाग असल्याचे सांगून त्यांनी संबंधित पाचही प्रकल्पांची माहिती दिली.

 belgaum

आज कर्नाटकातील मंत्री, खासदार आणि आमदारांनी मला अनेक कामे सांगितली आहेत. मी त्यांना संक्षिप्तमध्ये सांगू इच्छितो कि सीआरएफचे जे काम आहे ते राज्यात पेट्रोल व डिझेलवर जो सेस लागू होतो त्या पैशाच्या आधारावर चालते. यंदा अपेक्षेपेक्षा 9 पटीने जास्त कामे कर्नाटकसाठी मंजूर झाली आहेत. त्यामुळे यावर्षी आणखी नव्या कामांचे आश्वासन मी देऊ शकत नाही. मात्र पुढील पुढील वर्षी मंत्री, खासदार व आमदारांनी मागणी केलेल्या कामांचा मी नक्की विचार करेन. खासदार श्रीमती मंगला अंगडी आणि बसवगौडा पाटील यांनी नव्या राष्ट्रीय महामार्गाबाबत विचारणा केली आहे. लवकरच भारत माला -2 योजनेची घोषणा केली जाणार आहे. त्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग बाबतच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्यावर आम्ही सकारात्मक विचार करू. बेळगावच्या रिंगरोड बाबत बोलायचे झाल्यास त्याला यापूर्वीच आम्ही मंजुरी दिली आहे. एस. बी. पाटील व प्रभाकर कोरे यांनी यांनी एनएच 548 च्या सुधारणेबाबत निवेदन दिले आहे. त्या संदर्भात मी आदेश दिला असून वार्षिक योजनांमध्ये त्याचा समावेश केला जाईल असे गडकरी यांनी सांगितले.

काकती येथील फ्लाय ओव्हरसंदर्भात आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला परंतु लोकांच्या विरोधामुळे तो फ्लायओव्हर रद्द करावा लागला. जर जनतेचा विरोध होणार नाही याची जबाबदारी संबंधित आमदार घेत असतील तर मी त्या फ्लाय ओव्हरला पुन्हा मंजुरी देण्यास तयार आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील मला कांही कामे सांगितली आहेत. त्याबद्दल प्रामुख्याने आरओबीबाबत बोलायचे झाल्यास यावेळी अर्थसंकल्पात आम्हाला 1600 कोटी रुपये जास्त मिळाले आहेत. त्यातून सेतू भारत नांवाची योजना आम्ही राबवणार आहोत. त्याअंतर्गत देशभरात 10 हजार आरओबी मंजूर करण्यात आले असून त्यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या 12 आरओबींचा समावेश आहे, अशी माहिती गडकर यांनी दिली.Nitin gadkari

देशामध्ये ग्रीन फील्ड हायवे आणि इंडस्ट्रियल कॉरिडॉर निर्माण होत आहेत यासाठी 3 लाख 60 हजार 500 कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे असे सांगून मी असा एक मंत्री आहे की ज्याने आत्तापर्यंत 50 लाख कोटींची रस्त्याची विकास कामे केली आहेत. मी जे बोलतो ते 100 टक्के करतो. जे काम होणार नाहीत त्याची घोषणा मी करत नाही. त्यामुळे ग्रीनफिल्ड हायवे आणि इंडस्ट्रियल कॉरिडॉर यांची लांबी 9 हजार कि. मी. असणार आहे. देशातील 22 ग्रीनफिल्ड हायवान पैकी 3 एक्सप्रेस हायवे कर्नाटकातून जातात. त्या अनुषंगाने 30 हजार कोटी रुपयांची कामे कर्नाटकात सुरू आहेत. हे ग्रीनफिल्ड हायवे कर्नाटकाच्या विकास आणि उत्कर्षाला मोठा हातभार लावतील. बेंगलोर ते चेन्नई या 262 कि. मी. अंतराच्या एक्सप्रेस हायवेसाठी 18 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. येत्या सहा महिन्यात या हायवेचे काम पूर्ण होऊन उद्घाटन केले जाईल. सदर एक्सप्रेस हायवेमुळे बेंगलोर ते चेन्नई असा प्रवास अवघ्या 2 तासात करता येणार आहे असे सांगून मंत्री गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे हाती घेण्यात आलेल्या देशातील विविध महामार्गांच्या विकास कामांची माहिती दिली.Nitin gadkari

एखाद्या राज्याला देशाला वैभव संपन्नता जी येते ती रस्त्यांमुळे येते. व्यापार-उद्योग आदी कोणत्याही प्रकारच्या विकासासाठी पाणी ऊर्जा वाहतूक आणि संपर्क (वॉटर, पॉवर, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन) हे चार घटक अत्यंत महत्त्वाचे असतात. या चार घटकांशिवाय उद्योग उभे राहू शकत नाहीत. उद्योगाशिवाय भांडवल गुंतवणूक होत नाही. उद्योग आणि भांडवल गुंतवणुकी विना आपण रोजगार क्षमता वाढवू शकत नाही आणि रोजगार क्षमते शिवाय आपण गरिबी हटवू शकत नाही, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. तेंव्हा कर्नाटक सरकारने ग्रामीण भागातील गरीब मजूर आणि शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करावा. सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या भागात त्यादृष्टीने जास्तीत जास्त काम केले जावे. आपल्या देशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हाच मुख्य अजेंडा आहे असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

टाकाऊ कचऱ्याचे रूपांतर संपत्तीमध्ये रूपांतर करण्याचा सल्ला देताना आपण आपल्या मतदार संघातील टॉयलेटचे पाणी विकून सव्वा तीनशे कोटी रुपये कमविले आहेत. त्यातून ग्रीन हायड्रोजन निर्मिती प्रकल्प उभारला आहे असेही मंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी देशात उत्तम पायाभूत रस्ते सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. रस्त्यांच्या विकासामुळे फक्त आर्थिक भरभराट होत नाही तर देशाची एकता आणि अखंडता ही कायम राहते आणि हे काम माजी पंतप्रधान वाजपेयी याच्यानंतर केंद्रीय मंत्री गडकरी करत आहेत असे सांगितले. सदर समारंभात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग खात्याचे मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते रिमोटचे बटन दाबून महामार्ग प्रकल्पांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. समारंभास भाजपच्या स्थानिक नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांसह शेकडो नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.