बेळगाव महापालिकेची निवडणूक होऊन तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला तरी अद्यापही महापौर आणि उपमहापौर निवडणूक झालेली नाही. ही निवडणूक लवकरात लवकर घेतली जावी अशी मागणी होत असताना केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी बेळगावच्या महापौर आणि उपमहापौरांची टीकात्मक घोषणा करून टाकली आहे.
शहरातील काँग्रेस भवनमध्ये आज मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आमदार सतीश जारकीहोळी यांनी प्रथम म्हादाई आंदोलनासंदर्भात माहिती दिली.
म्हादाई संदर्भातील आंदोलन कोठून सुरू करायचे याबाबत पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा करून रूपरेषा ठरविली जाईल. त्यानंतर आंदोलन हाती घेतले जाईल असे त्यांनी सांगितले. गोव्यातील निवडणुकीसाठीची जबाबदारी काँग्रेस नेते दिनेश गुंडूराव यांच्यावर सोपवण्यात आली आहे. गुंडूराव यांच्या नेतृत्वाखाली आमचे उमेदवार जास्तीत जास्त संख्येने निवडून येतील यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
यासाठी त्या ठिकाणी आमच्या उमेदवारांचा जोमाने प्रचार सुरू आहे असे सांगून बेळगावात खाजगी होलसेल भाजीमार्केट सुरू केल्यास शेतकऱ्यांना त्रास होऊ शकतो असे आपण जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बेळगाव महापौर आणि उपमहापौर पदाच्या प्रलंबित निवडणुकीसंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आमदार सतीश जारकीहोळी यांनी त्या संदर्भात टीका करताना सध्या बेळगाव महापालिकेमध्ये अनाधिकृत महापौर आणि उपमहापौर कार्यरत असल्याचे सांगून दक्षिण आमदार महापौर आणि उत्तर आमदार उपमहापौर आहेत, तर उर्वरित सर्वजण चहा -बिस्कीटांसाठी मर्यादित आहेत, असे सांगितले. याप्रसंगी कॉंग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, माजी मंत्री ए. बी. पाटील, बागलकोट माजी जि. पं. उपाध्यक्ष सुशील बेळगली आदी उपस्थित होते.