सौंदत्ती श्री यल्लमा देवीची शाकंभरी यात्रा येत्या 19 डिसेंबरला होणार असून दोन वर्षांनी यंदा ही यात्रा होणार असली तरी महाराष्ट्रासह अन्य राज्यातील भक्तांना यात्रेत सहभागी होण्याची संधी मिळणार की नाही? याबाबत अद्याप संभ्रम आहे.
गेल्या दोन वर्षापासून शाकंभरी यात्रेत कोरोना प्रादुर्भावामुळे भक्तांना यात्रेत सहभागी होता आलेले नाही. दरवर्षी शाकंभरी पौर्णिमेला सौंदत्ती डोंगरावर यल्लमा देवीची मोठी यात्रा भरते.
यात्रेच्या वेळी कोल्हापूर येथील रेणुका देवी मातेच्या पाच मानाच्या जगांसह महाराष्ट्रातून लाखो भाविक दर्शनाला येतात. गेली दोन वर्षे मंदिर बंद ठेवण्यात आले होते.
गेल्या वर्षी केवळ मानाचे जग आणि पाच भक्त यांना पूजा करण्याची संधी देण्यात आली होती. आता ओमिक्राॅन व्हेरीएंटचा फैलाव रोखण्यासाठी म्हणून कर्नाटक सरकारने राज्यात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांसाठी कडक नियम लागू केले आहेत.
सरकारने अद्याप शाकंभरी यात्रेबाबत कोणताही आदेश जारी केलेला नाही. सरकारकडून आदेश आल्यावरच शाकंभरी यात्रेचे चित्र स्पष्ट होणार आहे.